सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे

Monday, 08 July 2019 07:59 AM


पुणे:
पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना महसूल मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. पुणे विभागातील जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, श्रीमती श्वेता सिंघल, डॉ. राजेंद्र भोसले, डॉ. अभिजीत चौधरी, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, गोपीचंद कदम, साहेबराव गायकवाड, रामचंद्र शिंदे तसेच महसूल विभागाचे उपायुक्त प्रताप जाधव, संजयसिंह चव्हाण, अजित पवार, जयंत पिंपळगावकर आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, गौण खनिज वसूलीच्या पध्दतीत बदल होणे गरजेचे आहे. यात आवश्यक बदल सुचविण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अन्य राज्यांच्या गौण खनिज वसूली पध्दतीचा अभ्यास करुन अहवाल राज्य शासनाला सादर करावा. सातबारा संगणकीकरणाचे कोल्हापूर जिल्ह्याचे काम 84 टक्के झाले असून नागरिकांच्या सोयीसाठी अन्य जिल्ह्यांनीही यास प्राधान्य देवून हे काम तात्काळ पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. पाटील यांनी सातबारा संगणकीकरणांतर्गत डिजीटल सिग्नेचर पोर्टल (डीएसपी) या आज्ञावलीत कामाची सद्यस्थिती, ई फेरफार, ऑनलाईन डाटा कम्फर्मेशन, डॉक्युमेंट स्कॅनिंग, अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण याबरोबरच जमीन महसूल व गौण खनिज वसूली याबाबतचा आढावा घेतला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सादरीकरण करुन पुणे विभागातील कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. तसेच कोल्हापूर क्रीडा संकुल, पंढरपूर व आळंदी विकास कामांबाबत माहिती दिली. विभागातील सर्व जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्याची माहिती सादर केली.

7/12 Satbara सातबारा ७/१२ चंद्रकांत पाटील chandrakant patil ई फेरफार E Ferfar online 7/12 ऑनलाईन सातबारा

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.