
देशातील कोरोना बाधितांची संख्या १५ हजार ८१५ झाली आहे. दिल्लीतील लेडी हार्डिंग हॉस्पिटलचे २ डॉक्टर आणि ६ नर्सेसचा कोरोना रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आला. हे सर्व जण मुलांच्या आयसीयूमध्ये ड्यूटीला होते. यानंतर हॉस्पिटलला कंटेनमेंट एरिया म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे राजस्थानात संक्रमणाची ४४ नवीन प्रकरणे समोर आली. देशात शनिवारी सर्वाधिक १३७१ कोरोनाग्रस्त मिळाले. तर एका दिवसात सर्वाधिक ४२६ रुग्ण बरे झाले. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या ३-४ दिवसांपासून कमी होत असल्याने सरकारला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, शनिवारी एकाच दिवसात तब्बल ३२८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइट आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे.
दरम्यान राज्यात ६६ हजार ८९६ टेस्ट झाल्या आहेत. यातील ९५ टक्के लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. साधारण ३ हजार ६५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७५ टक्के लोक सौम्य आहेत. गंभीर रुग्णांना वाचवण्याकडे आपले लक्ष आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुपारी जनतेशी लाईव्ह संवाद साधला. कोरोनामुळे अर्थव्यवस्था चिखलात रुतले आहे. अर्थचक्र हे फिरले पाहिजे म्हणून काही ठिकाणी मोजक्या स्वरूपात उद्योगधंद्यांना आपण परवानगी देत आहोत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील माफक स्वरूपात आपण उद्योगांना परवानगी देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान ई-कॉमर्स कंपन्यांकडून अनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरील बंदी कायम राहील असा आदेश गृहमंत्रालयाने शनिवारी जारी केला. यानुसार लोक आता या कंपन्यांकडून मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप यांसारखे सामान ऑर्ड करू शकणार नाहीत. दोन दिवसांपूर्वी सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना सर्व वस्तूंचा पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली होती.
महाराष्ट्रातील रुग्णांची आकडेवारी
मुंबई मनपा २२६८, ठाणे १८, ठाणे मनपा ११६, नवी मुंबई ६५, कल्याण-डोंबिवली ७३, उल्हासनगर १, भिवंडी निजामपूर ४, मीरा-भाईंदर ६४, पालघर २१, वसई-विरार ६२, रायगड १३, पनवेल २९, नाशिक मंडळ ८५, पुणे मंडळ ६१६, कोल्हापूर मंडळ ३८, औरंगाबाद मंडळ ३३, लातूर मंडळ १२, अकोला मंडळ ५६, नागपूर ६३, इतर राज्ये ११.