मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 61.30 टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.
दरम्यान, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते तात्काळ बदलून देण्यात आले. आज झालेल्या 14 मतदार संघात एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर 28 हजार 691 मतदान केंद्रांपैकी 3 हजार 825 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले. 1 लाख 54 हजार कर्मचारी या मतदान केंद्रांवर कार्यरत होते. 90 मतदान केंद्रांवर संपूर्ण महिला कर्मचारी होत्या तर चार मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे कार्यरत होती.
तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित मतदान अशाप्रकारे:
- जळगाव 58.00 टक्के
- रावेर 58.00 टक्के
- जालना 63.00 टक्के
- औरंगाबाद 61.87 टक्के
- रायगड 58.06 टक्के
- पुणे 53.00 टक्के
- बारामती 59.50 टक्के
- अहमदनगर 63.00 टक्के
- माढा 63.00 टक्के
- सांगली 64.00 टक्के
- सातारा 57.06 टक्के
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग 62.26 टक्के
- कोल्हापूर 69.00 टक्के
- हातकणंगले 68.50 टक्के. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या 14 मतदार संघात 62.88 टक्के मतदान झाले होते.
आज झालेल्या मतदानाबाबत अधिक माहिती देताना श्री. शिंदे म्हणाले, सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांचा चांगल्या प्रमाणावर प्रतिसाद दिसून आला. सुरुवातीला मॉक पोलमध्ये ईव्हीएम नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ ते बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस दिवसभरात एकूण 334 बॅलेट युनिट (बीयू) आणि 229 सेंट्रल युनिट (सीयू) तर 610 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मतदान यंत्र बदलून देण्याकरिता 14 मतदार संघांमध्ये एकूण 2 हजार 280 वाहने ठेवण्यात आली होती. ही वाहने जीपीएस द्वारे ट्रॅक केली जात होती. त्यामध्ये राखीव यंत्र ठेवण्यात आले होते. मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी आल्या ते बदलण्याकरिता या वाहनांचा वापर करण्यात आला. सुमारे 15 ते 20 मिनिटांच्या आत मशिन बदलण्यात आले असून त्यामुळे मतदानात कोठेही खंड पडला नाही, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
14 मतदार संघात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार होते. त्यापैकी 1 कोटी 33 लाख 19 हजार पुरुष तर 1 कोटी 24 लाख 70 हजार महिला मतदार आणि 652 तृतीय पंथी मतदार होते. रावेर मतदार संघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत अमोल सुरवाडे या मतदाराने संशय व्यक्त केला होता. त्यावर मतदान केंद्राध्यक्षांनी तांत्रिक बाब पूर्ण करण्याकरिता सर्वांसमक्ष मतदानाची चाचणी घेतली. त्यात श्री. सुरवाडे यांनी घेतलेल्या संशयात तथ्य न आढळल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
मतदान करताना गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी मतदारांना आवाहन करताना श्री. शिंदे म्हणाले, मतदान केंद्रांमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक यंत्र नेण्याची परवानगी नाही तो कायद्याने गुन्हा ठरतो. आज औरंगाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने टीक टॉक ॲपवर मतदान प्रक्रियेचे लाईव्ह चित्रिकरण पोस्ट केले. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत झालेल्या एका सभेत सहायक पोलीस आयुक्त नरसिंग यादव यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
Share your comments