मुंबई: उस्मानाबाद आणि लोहारा या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक कापणी प्रयोगातील त्रुटींमुळे नुकसान सहन करावे लागले आहे. सोयाबीन उत्पादक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना एकूण 56.61 कोटी नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन विभागाने देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री. देशमुख बोलत होते.
श्री. देशमुख म्हणाले, वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार आणि औरंगाबाद खंडपीठाच्या सुनावणीनुसार दोन्ही तालुक्यातील महसूल मंडळ गटाचे उंबरठा उत्पन्न व महसूल मंडळाची प्रत्यक्ष उत्पादकता विचारात घेऊन सात महसूल मंडळातील 58 हजार 236 शेतकऱ्यांना 53.68 कोटी तर लोहारा तालुक्यातील एक महसूल मंडळातील 8 हजार 539 सहभागी शेतकऱ्यांना 2.93 कोटी असे एकूण 56.61 कोटी नुकसान भरपाई देण्यात यावी.
त्याचबरोबर वर्धा जिल्ह्याच्या सरासरीच्या 49 टक्के पर्जन्य झालेले आहे. हे पुरेसे नसून, महाकाली धरणाच्या मृत साठ्यामधून पाणी उपलब्ध करून ते नागरिकांपर्यत पाहोचविण्यासाठी, अन्य जिल्ह्यातून पंप सेट उपलब्ध करणे, डिझेल जनरेटर भाड्याने घेण्यात यावे. यासंदर्भातील अंदाजपत्रकाची आवश्यक छाननी करून प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार वर्धाचे जिल्हाधिकारी यांना देण्यात यावेत व तातडीने कामे पूर्ण करण्यात यावी असे निर्देशही श्री. देशमुख यांनी यावेळी दिले.
बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, वित्त विभागाचे अवर सचिव गावकर, आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Share your comments