मुंबई: राज्यात खरीपाची 80.61 लाख हेक्टर क्षेत्रावर (54 टक्के) पेरणी झाली असून 92 तालुक्यांत 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सुमारे 17 जिल्ह्यांत 50 ते 75 टक्के पाऊस झाला असून सात जिल्ह्यांमध्ये 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देताना कृषीमंत्री म्हणाले, राज्यात 12 जुलैपर्यंत 379 मिमी पाऊस झाला आहे. राज्याच्या 355 तालुक्यांपैकी 28 तालुक्यांमध्ये 25 ते 50 टक्के, 137 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के, 98 तालुक्यांत 75 ते 100 टक्के आणि 92 तालुक्यांत 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 149.74 लाख हेक्टर क्षेत्र असून 80.61 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण व पुणे विभागात अनुक्रमे 36 हजार 355.29 हेक्टर तर 4 हजार 929.07 हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहे. राज्यात पुणे व लातूर विभागात काही ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.
- कोकण विभागात 47 तालुक्यांपैकी 2 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. कोकण विभागात 4.61 लाख हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी 1.19 लाख हेक्टर (26 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
- नाशिक विभागात एकूण 40 तालुक्यांपैकी 4 तालुक्यांत 25 ते 50 टक्के, 16 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के, 11 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के तर 9 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नाशिक विभागात खरीप पिकाच्या 21.31 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 13.54 लाख हेक्टर (64 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
- पुणे विभागात खरीप पिकाच्या 7.11 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 2.85 लाख हेक्टर क्षेत्रावर (40 टक्के) पेरणी झाली आहे.
- कोल्हापूर विभागात खरीप पिकाखालील 8.16 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 4.05 लाख हेक्टर क्षेत्रावर (50 टक्के) पेरणी झाली आहे.
- औरंगाबाद विभागात खरीपाचे क्षेत्र 20.15 लाख हेक्टर असून 14.45 लाख हेक्टर क्षेत्रावर (72 टक्के) पेरणी झाली आहे.
- लातूर विभागात खरीप पिकाचे क्षेत्र 27.87 लाख हेक्टर असून त्यापैकी 12.59 लाख हेक्टर क्षेत्रावर (45 टक्के) पेरणी झाली आहे.
- अमरावती विभागात 32.31 लाख हेक्टर क्षेत्र खरीपाचे असून 23.77 लाख हेक्टर क्षेत्रावर (74 टक्के) पेरणी झाली आहे.
- नागपूर विभागात खरीप पिकाचे क्षेत्र 19.18 लाख हेक्टर असून त्यापैकी 7.88 लाख हेक्टर क्षेत्रावर (41 टक्के) पेरणी झाली आहे.
ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, गोंदीया आणि चंद्रपूर या 10 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे.
Share your comments