१. नाशिकमधील कांदा व्यापारी आजपासून बेमुदत संपावर
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी पुन्हा संपावर गेले आहेत. आजपासून व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिलीय. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह इतर १७ बाजार समिती आणि उपबाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढल्या आहेत.
२. छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढणार
कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आता वाढणार आहे. नव्या 42 गावांचा या क्षेत्रात समावेश करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला आहे. या निर्णयावर सतेश पाटील यांनी टीका केली आहे. नव्या गावांचा समावेश करण्यापेक्षा कारखान्याच्या खाजगीकरणाचा ठराव करून घ्या. तसंच कारखान्याची वाटचाल खाजगीकरणाकडे सुरू आहे, असा आरोप देखील सतेज पाटील यांनी महाडिक गटावर केला आहे.
३. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची संततधार कायम
सोमवारपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस सर्वत्र नाही. मात्र काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. मंगळवारी गणेश आगमनाच्या दिवशीही राज्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढचे काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची संततधार राहिल असा अंदाज हवामान खात्याने दिलाय. मुंबई, ठाणे, पालघरमध्येही ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाची उघडीप असणार आहे.
४. मराठवाड्यात चारा प्रश्न बनला गंभीर
मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८ हजार ६० पशुपालक शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी मोफत बियाणे मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे मागणी केली आहे. मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने पशुपालक चिंतेत सापडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे जनावरांना पावसाळ्यातच चारा नाही, तर हिवाळा आणि उन्हाळ्यात काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
५. पदवीधर शेतकऱ्याने केली डाळिंबाची यशस्वी शेती
कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील पदवीधर शेतकऱ्याने उत्तम प्रकारे डाळिंबाची यशस्वी शेती केली आहे. या शेतीतून त्यांना आता आर्थिक फायदा मिळतो आहे. विवेक रायकर यांचे डाळिंब थेट बांगलादेशमध्ये निर्यात होत आहेत. डाळिंबाचा रंग, आकार, आणि दर्जा पाहून डाळिंब खरेदी करणारे अनेक व्यापारी त्याच्या बागेतील डाळींबाची मागणी करत आहेत. रायकर यांच्या डाळिंबाला आळेफाटा येथील बाजारात १९४ रुपये किलोचा भाव देखील मिळाला आहे.
Share your comments