१) मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबई बाजार समितीत बंद
मराठा आरक्षणसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबई बाजार समितीतील कामगारांनी पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगारांनी उपोषण करत बाजार समिती बंद ठेवली. यामुळे आज फळ, फूल, मसाला मार्केटसह बाजार समिती बंद होती. नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत माथाडी कामगारांनी सर्वानुमते निर्णय घेतल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीनं दिली आहे.
२) खासदारांच्या वाहन ताफ्याची गावकऱ्यांकडून तोडफोड
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे,अशी त्यांची मागणी आहे. मराठा समाजाचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. तसंच अनेक गावात मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केली आहे. यामुळे काल रात्री उशिरा शिवसेना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा ताफा गावबंदी असताना गावात आल्याने ताफ्यातील वाहनांची गावकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना घटली आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावातील रात्री उशिरा ही घटना घडली आहे.
३) 'शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट कारवाई करा'
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारने खरेदी प्रक्रिया आणि हमीभाव जाहीर केले आहेत. तरी काही व्यापारी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हमीभावाने सुरु असलेल्या खरेदी प्रक्रियेचा उपलब्ध अन्न धान्य साठ्यांचा तसेच खरेदी विक्री संघाच्या कामकाजासंदर्भातील सद्यस्थितीबाबत विभाग प्रमुखांशी अब्दुल सत्तार यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला आदेश दिलेत.
४) मराठवाडा, विदर्भाला पाणी देण्याचा आराखडा तयार
महाराष्ट्राचा ५० टक्के भाग अवर्षणग्रस्त आहे. या भागाला पाणी दिल्याशिवाय महाराष्ट्रातील आत्महत्याची संख्या कमी होणार नाही. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी नदीपात्रात वळते करून मराठवाडा सुजलाम सुफलाम करू शकतो. या योजनेचा आराखडा तयार केला आहे. तसेच वैनगंगा नदीच्या खालील भागातून वाहून जाणारे १०० टीएमसी पाण्यापैकी ६७ टीएमसी पाणी नळगंगा मध्ये आणू शकतो. ज्यातून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू शकतो. यासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पांनाही मदत करावी. अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे.
५) राज्यात थंडीची चाहूल वाढली
राज्यातील तापमान कमी होऊ लागल्याने थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. कमाल तापमानातही घट झाल्याने उन्हाचा चटका कमी होत आहे. काल सोलापूर, रत्नागिरी येथे तापमान ३६ अंशांच्या वर होते. तर उर्वरित राज्यात देखील कमाल तापमानात घट झाली आहे. तर किमान तापमानात घट होत असल्याने येणाऱ्या काळात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच पहाटेच्या वेळी गारठा वाढला आहे. तर राज्यात थंडी हळूहळू वाढत जाणार आहे.
Share your comments