१) अब्दुल सत्तार यांना गावबंदी
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावरणी येथे गावात येऊ न दिल्याची घटना घडली आहे. गावातील रहिवाशांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी सत्तार आले होते. त्यावेळी सत्तार यांचा ताफा गावात येताच संपूर्ण गाव जमा झाला. तसंच गावातील काही पोरांनी ‘अब्दुल सत्तार चले जाव’च्या घोषणा देखील दिल्यात. हा गावकऱ्यांचा संताप पाहून अब्दुल सत्तार यांनी गावातून काढता पाय घेतला.
२) दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू उत्पादक नाराज
दसरा दिवाळीत झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. यामुळे शेतकरी झेंडूची लागवड करतात. पण यंदा मात्र दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी दराअभावी शेतकऱ्यांना नाराज केले आहे. पुणे, मुंबई, नाशिकच्या बाजारपेठेत झालेल्या घसरणीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाशिकमध्ये केवळ १० ते १५ रुपये भाव मिळतोय. तर पुणे जिल्ह्यात देखील झेंडूच्या दराची हीच स्थिती आहे. बाजारात आवक वाढल्याने फुलांना चांगला दर मिळाला नाही. यामुळे शेतकरी वर्गासमोर सणाच्या पार्श्वभूमीवर संकट निर्माण झाले आहे.
३) फळ उत्पादकांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमाची भरपाई देण्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा राज्य हिस्सा २७ लाख ११ हजार १४० रुपये जमा केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना फळपीक विम्याची रक्कम खात्यात लवकर जमा होण्याची शक्यता आहे.
४) राज्यातील तापमानात चढ-उतार
मान्सून परल्यामुळे कोरडे हवामान झाले आहे. यामुळे राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. आज राज्यात ढगाळ आणि कोरडे हवामान असल्याने तापमान कमी जास्त राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान काहीसे कमी झाले आहे. तसंच दक्षिण भारतात मान्सून असल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहेत.
५) पीएम किसान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना नवीन योजनाचा लाभ
केंद्र सरकारकडून पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना लाभ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सध्या पिकांसाठी विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. सरकार या विमा योजनेतील व्याप्ती वाढवण्याची तयारी करत आहे. येत्या काही दिवसांत या योजनेंतर्गत तलाव, ट्रॅक्टर, जनावरे आदींच्या विमा संरक्षणाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारकडून तयारी सुरू आहे.
Share your comments