राज्यात मागिल तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील एकूण 47 हजार 109 हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी पिके जमीनदोस्त झाली असून फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आला असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. तसेच कापूस, ज्वारी, हरभरा, मका, गहू, ऊस आणि केळी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
मराठवाड्यात 22 हजार 97 हेक्टरवरील जिरायत क्षेत्रावरील, तर 24 हजार 855 हेक्टरवरील बागायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, एकूण 157 हेक्टरवरील फळबागचे देखील नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाले आहे. फळबागा, पोल्ट्री फार्म, शेततळे, वाहने, शेड, तसेच घरांचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील जवळपास ५९८ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर दोन दिवसात १८० जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच राज्यातील अवकाळी पाऊसामुळे प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Share your comments