1. बातम्या

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ६७६ वर; पोलिसांनाही कोरोनाची लागण

KJ Staff
KJ Staff


महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ३२ वर पोहचली आहे. तर, पुणे विभागात ६६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, नाशिकमधील मालेगावमध्ये संक्रमित वाढत आहेत, जिल्ह्यात आतापर्यंत ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकट्या मालेगावमध्ये ८५ आहेत. दरम्यान राज्यात एकूण ४ हजार ६७६ जण कोरोनाबाधित आहेत.
राज्यात आतापर्यंत 75 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. ज्या भागात जास्त रुग्ण आहेत, त्या भागातील रुग्णांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन देण्यात येत आहे. तर, मुंबईच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सीजन स्टेशन बनवण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

लॉकडाऊन दरम्यान १३ हजार जणांना अटक
राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २० एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६०, ००५ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १३ हजार ३८१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४१ हजार ७६८ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रका मार्फत देण्यात आली आहे.  राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा ५८९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०६२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

 पोलिसांना कोरोनाची लागण
राज्यात एकीकडे करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना, दुसरीकडे नागरिकांनी शासनाचे आदेश पाळून घरातच थांबावे व विनाकारण रस्त्यांवर फिरू नये यासाठी दिवसरात्र बंदोबस्तावर तैनात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. २२ मार्च पासून ते आज दुपारी ४ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातील ११ पोलीस अधिकारी व ३८ पोलिसांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मिळाली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters