पुणे : मनात ध्येय आणि इच्छाशक्ती असेल तर माणूस कोणतेही अशक्य काम सहज शक्य करू शकतो. असेच काहीतरी पुणे जिल्ह्यातील बारामती येथील माळेगाव येथे घडले आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील युवती पोलिस दलात दाखल झाल्या आहेत.
माळेगाव (ता. बारामती) येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ३३ शेतकरी कन्या यंदा पोलिस सेवेत भरती झाल्या आहेत. तसेच तीन युवकांना पोलिस सेवेत काम करण्याची संधी मिळाली. शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील युवतींमधला कणखरपणा, क्रीडा संकुलातील भरतीपूर्व अद्ययावत प्रशिक्षण आणि संबंधित युवतींच्या मनात ध्येय साध्य करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आदी कारणांमुळे शेतकरी कन्यायांनी हे यश संपादन केले आहे.
शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी या यशस्वी पोलिस काॅन्स्टेबल झालेल्यांचा सन्मान केला. यावेळी, माळेगावचे माजी संचालक दीपक तावरे, प्रशिक्षक लक्ष्मण भोसले यांनीही शेतकरी कन्या यांचा सन्मान केला. सन २०१४ पासून या माळेगाव क्रीडा संकुलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या २८० युवती पोलिस सेवेत दाखल झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये यंदा ३६ मुलामुलींचा समावेश आहे.
या सन्मान सोहळ्याला नितीन तावरे, बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रेय येळे, राहुल घुले, प्रमोद जाधव, प्रा. अनिल धुमाळ, विजय भोसले, योगेश भोसले, प्रणव तावरे, प्रशिक्षक राहुल पवार, कीर्ती पवार, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोक पाटील, अनिल काटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार म्हणाल्या, ग्रामीण भागातील होतकरू व गरीब मुलामुलींना पोलिस दलासह विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. माळेगावच्या यशस्वी मुलींनी स्वयंपूर्ण होऊन आपल्यासाठी एक वेगळी वाट निवडली. खाकी वर्दीतील रुबाबदार मुलगी जेव्हा गणवेशात घरी जाईल, त्या वेळी पालकांसह समाजाचा नक्की अभिमानाने ऊर भरून येईल. माळेगावच्या युवतींनी कणखरपणाच्या जोरावर व प्रशिक्षक लक्ष्मण भोसले, दीपक तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश संपादन केले याचा मला मनस्वी आनंद आहे,'' असे अध्यक्षा शर्मिला पवार म्हणाल्या.
Share your comments