1. बातम्या

डॉक्टरांसाठी 3 वर्षांची ग्रामीण सेवा बंधनकारक

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
ग्रामीण आरोग्य निगेबाबत नव्या दृष्टिकोनाचे आवाहन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. ते आज महाराष्ट्रात लोणी इथे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाच्या 13 व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. आरोग्य सेवेची गुणवत्ता किती पैसे दिले जात आहेत, त्यावरुन निश्चित केली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले. पदवी प्राप्त 437 विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. पदवी प्राप्त करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विकासासाठी महिला सक्षमीकरणाहून अधिक प्रभावी मार्ग कोणताही नाही, असे त्यांनी सांगितले. 

ग्रामीण भागात अधिक गुणवत्तापूर्ण डॉक्टर, नर्स आणि रोगनिवारणतज्ज्ञांची आवश्यकता असल्याचे सांगून डॉक्टरांसाठी ग्रामीण सेवा 3 वर्षांसाठी बंधनकारक करण्याची सूचना त्यांनी केली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. पद्मभूषण दिवंगत बाळासाहेब विखे-पाटील यांनी संस्थेच्या उभारणीत आणि ग्रामीण आरोग्यसेवेसाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक उपराष्ट्रपतींनी केले.

भारताची युवापिढीच भविष्य निश्चित करणार असून, राष्ट्र उभारणीत त्यांना अर्थपूर्ण भूमिका निभावता यावी, यासाठी त्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण विशेषत: व्यावसायिक आणि तंत्रविषयक शिक्षण देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आपल्या देशाच्या प्रचंड लोकसंख्येला आरोग्य सुरक्षा पुरवण्याकरिता अजून खूप काही करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

ग्रामीण क्षेत्राच्या तुलनेत शहरी भागात चार पट अधिक डॉक्टर असल्याचे ते म्हणाले. ‘राम राज्य’ अवतरण्यासाठी ‘ग्राम राज्य’ निर्माण करण्याची आवश्यकता उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. वैद्यकीय सेवांच्य वाढत्या किंमतींविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे या किमती कमी होण्यास सहाय्य होईल, असे त्यांनी सांगितले. सर्व शैक्षणिक संस्थांनी नव तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि विकास अंदाजपत्रकात चांगली तरतूद करावी, असे आवाहन त्यांनी केले.

वैद्यकीय क्षेत्र ‘सेवा’ असल्याचे सांगून देशाच्या आरोग्याचे संरक्षण करुन राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी वैद्यक क्षेत्राला केले. केवळ आरोग्य संपन्न राष्ट्रच श्रीमंत राष्ट्र होऊ शकते, असे ते म्हणाले. श्रीमंत किंवा गरीब आपल्या सर्व रुग्णांना सारख्याच तत्परतेने, गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे आणि सन्मानाने वागणूक देण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

राष्ट्रभक्ती, प्रामाणिकपणा, शांतता, दयाभाव, आदर, सलोखा आणि सहसस्तित्व ही मूल्ये जोपासण्याचे, मानवतेची सेवा करण्याचे, भूक, दारिद्रय, अज्ञान आणि अंधश्रद्धा या आव्हानांविरोधात लढण्यासाठी स्वत:ला समर्पित करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर रावही उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters