RBI Bank Update : गुलाबी रंगाच्या २ हजार नोटा बदलण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर होती. पण आता ही मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अजूनही २ हजारांच्या नोटा आहेत त्यांना बदलण्यासाठी आणखी सात दिवस मिळाले आहेत. रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी अजूनही २ हजार रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता ७ ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहे. एकाच वेळी कमाल २० हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. ८ ऑक्टोबर पासून बँका नोटा जमा करण्याचे किंवा खात्यात पैसे वर्ग करण्याचे थांबवतील. तसंच नोटा बदलून त्यांचे मूल्य देण्याचे देखील थांबवतील.
१९ मे २०२३ रोजी चलनात असलेल्या दोन हजारांच्या एकूण ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटांपैकी ३.४२ लाख कोटी परत मिळाले आहेत. २९ सप्टेंबर २०२३ रोजी ०.१४ लाख कोटी चलनात आहेत. त्यामुळे १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या २ हजारांच्या ९६ टक्के नोटा परत आल्या आहेत.
ज्यांच्याकडे २ हजारांच्या नोटा आहेत ते बँकेतून बदलून घेऊ शकतात. तसंच रिझर्व्ह बँकेच्या असलेल्या १९ प्रादेशिक कार्यालयातून देखील पैसे बदलून घेऊ शकतात, असं यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, जारी करण्यात आलेल्या पत्रकात DCM(Plg)No.S-236/10.27.00/2023-24 दिनांक १९ मे २०२३ च्या परिच्छेद ३A अंतर्गत जारी केलेल्या सर्व सूचना अंमलात राहतील. ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत त्यांच्या शाखांद्वारे जमा केलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा १३ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी करन्सी चेस्टमध्ये जमा केल्या जातील याची देखील बँकांनी खात्री करावी, अशी सूचना देखील बँकांना दिली आहे.
Share your comments