रोज स्वयंपाकाला वेगळ्या भाज्या करायच्या म्हणजे किती वेगळ्या करणार? त्याच त्याच स्वादाच्या भाज्या खाऊनही कंटाळा येतो. भाज्यांना स्वाद आणण्यासाठी मसाले वापरतो. आणखी स्वाद यावा म्हणून बाजारातून आणखी वेगवेगळे मसाले घेऊन येतो, पण भाज्या आमट्यांना मनासारखा स्वाद मिळतच नाही.
नेहेमीच्या भाज्या आमट्या स्वादिष्ट करण्याचा उपाय आपल्याच हातात आहे. घरी दोन प्रकारचे मसाले करा, आलटून पालटून वापरा आणि बघा भाज्या आणि आमट्यांची चव कशी पसंतीस उतरते ते. हे दोन मसाले कोणत? कांदा लसूण मसाला आणि काश्मिरी गरम मसाला. हे मसाले घरच्याघरी सहज तयार करता येतात. रोजच्या ंभाज्यांना महाराष्ट्र आणि उत्तरेकडील स्वादाचा स्पेशल इफेक्ट देऊ शकतो. आपल्या हातानं केलेल्या मसाल्यांचा स्वाद आणि त्या मसाल्यांमुळे भाजी आमटीला येणारी चव विशेषच असते नाही का?
कांदा लसूण मसाला
भाज्यांना विशिष्ट चव आणण्यासाठी कांदा लसूण मसाला खूपच उपयुक्त ठरतो. हा मसाला तयार करण्यासाठी 100 ग्रॅम उन्हात सुकवलेला कांदा, 50 ग्रॅम लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जीरे, अर्धा चमचा लवंग, अर्धा चमचा नाग केशर, अर्धा चमचा काळी मिरे, 10-12 छोट्या वेलची, 3 दगडफुलं, 1 इंच दालचिनी, 1 ग्राम काळे जिरे, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा पांढरे तीळ, 3 तेजपानं, अर्धा कप धने, 1 चमचा तेल, अर्धा वाटी किसलेलं खोबरं, आणि 100 ग्रॅम सुकी लाल मिरची एवढी मसाला सामग्री घ्यावी.
कांदा लसूण मसाला करताना सर्वात आधी सर्व खडे मसाले एक एक करुन सुकेच भाजून घ्यावेत. भाजताना जोपर्यंत या मसाल्यांचा वास येत नाही तोपर्यंत ते भाजावेत. नंतर कढईत तेल गरम करावं. त्यात लसणाच्या पाकळ्या घालून त्या एक दोन मिनिटं परतून घ्याव्यात. नंतर त्यात सुकलेला कांदा घालून तो दोन तीन मिनिटं परतून घ्यावा. कांदा भाजला गेला की किसलेलं नारळ घालून ते भाजून घ्यावं. त्याच गरम कढईत लाल मिरची घालून ती दोन तीन मिनिटं परतून घ्यावी. भाजलेली सर्व सामग्री गार होवू द्यावी. गार झालेली सामग्री मिक्सरमधे वाटून घ्यावी. हा मसाला हवाबंद डब्यात ठेवावा. हा मसाला एक महिना टिकतो. महिनाभर पुरेल एवढाच मसाला करावा.
काश्मिरी गरम मसाला
काश्मिरी गरम मसाल्याचा स्वाद विशेष असतो. कारण हा मसाला तयार करताना जायफळ आणि बडीशेप वापरली जाते. या मसाल्यासाठी 1 मोठा चमचा जिरे, 3 हिरवी वेलची, 6 लवंगा, 2 इंच दालचिनी, 2 मोठे चमचे धने, दोन मोठे चमचे काळे मिरे, 1 मोठा चमचा बडिशेप, 2 तेजपानं, 2 जायपत्री आणि पाव चमचा जायफळ पावडर घ्यावी.
हा मसाला करणं अगदीच सोपं आहे. सर्व सामग्री एक एक करुन कोरडी छान वास सुटेपर्यंत भाजून घ्यावी. सर्व सामग्री थंड होवू द्यावी. थंड झाल्यावर ती मिक्सरमधे वाटून घ्यावी. हवाबंद डब्यात हा मसाला भरुन ठेवावा.
हे दोन्ही प्रकारचे मसाले घरात तयार करुन ठेवले की आपल्या भाज्यांना विशेष चव आलीच म्हणून समजा.
Share your comments