मेंढपाळांसाठी 80 रूपयात 2 लाखांचा विमा उतरविणार

Monday, 17 December 2018 12:39 PM


औरंगाबाद:
महाराष्ट्र राज्यात मेंढ्या तसेच शेळी पालन यावर आपली उपजिविका भागविण्याऱ्या मेंढपाळाची संख्या मोठी आहे. विविध समस्यांना सामोरे जाणाऱ्या मेंढपाळांसाठी लवकरच 80 रुपयामध्ये 2 लाखांचा विमा उतरविण्यात येणार असून त्याचा लाभ प्रत्येक मेंढपाळाला दिला जाणार असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभाग मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ पुणे अंतर्गत मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगाव येथे मेष व लोकर सुधार योजने अंतर्गत मेंढपाळ कार्यशाळचे आयोजन तसेच राज्य योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या शेंळ्या-मेंढ्याचे आधुनिक शेडचे उद्घाटन व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेळ्या-मेंढ्यासाठी शेड बांधकामाचे भूमिपूजन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश बनसोडे, पशुसंवर्धनचे अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण, प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. गजानन सांगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. भगत, उपविभागीय अभियंता कदीर अहमद, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भिकमसिंग राजपुत, कनिष्ठ उपअभियंता बी. आर. चौंडीये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिगंबर काबंळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी मंत्री जानकर म्हणाले की, बंदीस्त शेळी पालनासाठी राज्य शासनाने 50 कोटी रुपयांची राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू केली आहे. या योजनेचा सर्व मेंढपाळ तसेच धनगर समाजातील बांधवांनी लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी. सर्व मेंढ्या-शेळ्यांचे संपूर्ण लसिकरण करून त्यांना आजारापासून दूर ठेवा त्यासोबतच आपल्या मुला-मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची गोडी लावावी असे आवाहनही त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर मेंढ्याच्या लोकरापासून तयार वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

राज्यातील मेंढपाळासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबरोबरच मोठया प्रमाणात शेडची उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील तिन्ही महामंडळे हे फायद्यात असून शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सुचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. अधिकारी तसेच कर्मचारी यांचे काम उत्कृष्ट असल्याने मंत्री जानकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी कार्यशाळेला उपस्थित असलेल्या मेंढपाळ तसेच शेतकऱ्यांना शेळी-मेंढ्यासाठीच्या जंतनाशक औषधीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. राजशेखर दडले यांनी केले. 

mahadev jankar Punyashlok Ahilyadevi Sheli Mendhi Vikas Mahamandal महादेव जानकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.