ग्रामविकास विभागात 13 हजार 514 जागांची महाभरती

Monday, 04 March 2019 07:50 AM


मुंबई:
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निर्णय घेत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय नोकरीचे दालन खुले करून दिले आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांची मेगा भरती होणार आहे. या मेगा भरतीमुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरूणांना सुवर्णसंधी चालून आली आहे.

ग्रामविकास विभागाअंतर्गत विविध प्रकारच्या 21 पदांवर ही मेगाभरती होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरल्यास कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी तर होईलच, शिवाय नव्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी मेगाभरती बाबतचा हा निर्णय घेतल्यानंतर विभागाने पद भरतीचे आदेश काढले आहेत.

खालील पदांसाठी होणार मेगाभरती:

ग्रामविकास विभागाच्या आस्था 8 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के), आरोग्य सेवक (पुरूष 40 टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहाय्यक), पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांसाठी ही भरती होणार आहे. 

ही मेगाभरती राज्यातील सहाही विभागात होणार असून सर्वाधिक जागा पुणे विभागात 2 हजार 721 असून तर त्या खालोखाल औरंगाबाद विभागात 2 हजार 718 आहेत. नाशिक विभागात 2 हजार 574, कोकण विभागात 2 हजार 51, नागपूरमध्ये 1 हजार 726 तर अमरावती विभागात 1 हजार 724 अशा एकूण 13 हजार 514 जागांवर तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पदांची भरती व त्याचे आरक्षण शासन नियमानुसार असून तशी जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदेकडून वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरवात होणार आहे.

Pankaja Munde पंकजा मुंडे ग्रामविकास विभाग Rural Development Department मेगाभरती

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.