नवी दिल्ली: गेल्या 13 नोव्हेंबर पर्यंत देशातील 202 साखर कारखान्यात 121.88 लाख टन ऊसाचे गाळप झाले असून त्यातून 10.80 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 2018-19 या साखर वर्षात देशभरात 324 लाख टन साखरेचे उत्पादन होईल हे अपेक्षित आहे अशी आशा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व आमदार श्री. दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
गतवर्षी याच कालावधीत म्हणजे 13 नोव्हेंबर पर्यंत साधारणतः 19 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. चालू साखर वर्षात महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 5.60 लाख टन साखरेचे उत्पादन (62.92 लाख टन ऊस गाळप) झाले असून त्या खालोखाल कर्नाटकाचा नंबर लागतो. तेथे 2.30 लाख टन साखरेचे उत्पादन (24.21 लाख टन ऊस गाळप) झाले आहे. याच कालावधीत उत्तर प्रदेशात 1.10 लाख टन साखरेचे उत्पादन (12.79 लाख ऊस गाळप) झाले आहे.
ऊसाचे गाळप व साखर उत्पादनात गुजरात व तामिळनाडू चवथ्या क्रमांकावर असून तेथे याच काळात प्रत्येकी 0.90 लाख टन साखरेचे उत्पादन (11.84 लाख व 10.11 लाख टन ऊस गाळप) झाल्याचे श्री. वळसे पाटील यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 103 साखर कारखाने चालू स्थितीत असून उत्तर प्रदेशात अशा कारखान्यांची संख्या 42 आहे तर कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूत त्यांची संख्या अनुक्रमे 28, 14 व 10 अशी आहे.
श्री. वळसे पाटील पुढे म्हणाले 2018-19 या साखर वर्षात उत्तर प्रदेशातून 122 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे तर महाराष्ट्रातून 97 लाख टन, कर्नाटकातून 41 लाख टन, गुजरात मधून 11 लाख टन, तामिळनाडूतून 10 लाख टन, बिहार, पंजाब व हरियाणातून प्रत्येकी 8 लाख टन, मध्यप्रदेशातून 6 लाख टन, आंध्रप्रदेशातून 5 लाख टन, उत्तराखंडातून 4 लाख टन, तेलंगणा आणि उर्वरित देशातून प्रत्यकी 2 लाख टन साखरेचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
Share your comments