रायगड
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. काही ग्रामस्थ भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी ५० कंटेनरची व्यवस्था करण्यात येत असून या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
बुधवारी (दि.१९) रोजी या ठिकाणी दरड कोसळून इर्शाळवाडी गाव दरडखाली येऊन उद्ध्वस्त झालं आहे. या ठिकाणी NDRF कडून बचावकार्य सुरु आहे. या घटनेत आणखी मृत्यू झालेल्या लोकांना आकडा वाढण्याची शक्यता आहे.
रायगडमधील अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी इर्शाळवाडी वसलेली आहे. मदतीसाठी कोणतीही साधने आणता येणे शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य होत आहे. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू असून इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
दरम्यान, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस असूनही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच मदत कार्यासाठी पुढे सरसावलेल्या संस्था- स्वयंसेवकांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार देखील मानले आहेत.
Share your comments