Devendra Fadanvis News : कृषी पंपांना दिवसा पुरेशी वीज मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसह सर्वच स्तरावरून ही मागणी होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. आगामी काळात कृषी फिडर सौरऊर्जेवर टाकून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते.
शासकीय योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. भंडारा हा तलाव, जंगल, वने तसेच धानाचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पर्यटनासह उद्योग विकासासाठी प्रयत्न करीत आहोत. राज्याने शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपया भरून सुरु केलेल्या सर्वसमावेशक पीकविमा योजनेत पहिल्याच वर्षी १ कोटी ६६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारी ही योजना ठरली आहे.
शासनाने अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनिसांचे मानधन वाढविले. पोलिस पाटलांच्या मानधन वाढीचा देखील विचार सुरु आहे. शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम वाढविली. ओबीसी घटकांकरीता मोदी आवास योजना सुरु केली असून ओबीसीसाठी १० लाख, तर अनुसूचित जाती, जमातीसाठी ५ लाख घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वसामान्यांना घर मिळाले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे.
भंडारा जिल्ह्यात अंभोरा येथे ३५२ कोटी रुपयांचा जल पर्यटन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटनासह रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. गोसीखुर्द राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्र शासनाने देखील या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला आहे. २०२४ च्या शेवटपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देऊ, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Share your comments