Jalna News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता हिंसक होताना दिसत आहे. गावागावात आता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याासाठी साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. याचदरम्यान आता मराठवाड्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते हिंसक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांकडून मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात १२ बस फोडण्यात आल्या आहेत. तर जालन्यात महिला तहसीलदारांची अज्ञातांनी गाडी देखील फोडली आहे.
नांदेड, बीड, जालना, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वातावरण तापले आहे. बसेसवर दगडफेकीच्या घडना घडल्याने एसटी महामंडळाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह विविध विभागातील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
धाराशिव जिल्ह्यात ६ बसची दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यापाठोपाठ परभणी आगाराच्या ३ बसेसवर परभणीकडे जात असताना जालन्यातील रामनगर ते मंठ्यादरम्यान दगडफेक झाली आहे. यामुळे या परभणी आणि धाराशिव दरम्यान तणाव दिसून आला आहे.
मराठा समाज आक्रमक झाला असून आता हिंसक वळण घेतले जात आहे. यामुळे एसटी प्रशासनाने मराठावाड्यातील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांना शाळकरी विद्यार्थ्यांना बससेवा बंद असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जालन्यात तहसीलदार यांच्यावर गाडीवर दगडफेक
जालना जिल्ह्यातील रामनगर येथील तहसीलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली. बाजीउम्रद येथील मोबाईल टॉवरवर चढलेल्या आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून ही गाडी फोडण्यात आली आहे.
Share your comments