
Panhala Fort News
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नगरविकास विभागाच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
विधानभवनात आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची आणि लाखो शिवप्रेमींची ही मागणी मान्य करत शिवस्मारकाचा कामासाठी तत्काळ या निधीला मंजुरी दिली. याबाबतीतला शासन निर्णय तत्काळ काढण्यात येऊन तो या आमदारांना सुपूर्द करण्यात आला.
या निर्णयामुळे पन्हाळा किल्ल्यावर छत्रपतींचे स्मारक असावे अशी इच्छा बाळगणाऱ्या लाखो शिवप्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पन्हाळा किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वतः महाराजांनी या किल्ल्यावर १३३ दिवस वास्तव्य केले होते. तसेच सिद्धी जोहरने टाकलेला पन्हाळ्याचा वेढा असेल, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेने दिलेले बलिदान असेल किंवा त्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य असेल असे ऐतिहासिक महत्त्व या किल्ल्याला आहे. मात्र तरीही या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही पुतळा नसल्याने याठिकाणी शिवस्मारक व्हावे अशी मागणी करण्यात येत होती. पन्हाळा किल्ल्यावर शिवछत्रपतींचे स्मारक असावे ही मागणी पहिल्यांदा करण्यात आल्यानंतर त्यावेळेसचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला होता. पन्हाळा किल्ल्यावरील तळ्याच्या मध्यभागी चौथरा बांधून त्यात हे स्मारक उभारण्यात येणार होते. मात्र काही कारणांमुळे शिवस्मारकाचे हे काम पूर्ण होऊ शकले नाही.
अखेर कोल्हापूरचे आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबीटकर यांनी आता पुन्हा या मागणीचा पाठपुरावा केला. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
Share your comments