मुंबई: ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत गेल्या 5 वर्षात राज्यातील 1 लाख 67 हजार 311 शेततळ्यांची निर्मिती होऊन 39 लाख 450 एकर क्षेत्रासाठी संरक्षित सिंचन व्यवस्था झाली आहे. ही योजना रोजगार हमी विभागामार्फत राबविली जाते. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे मूल्यमापन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेमार्फत करण्यात आले. या मुल्यमापनाच्या अनुषंगाने क्षेत्रिय तपासणीत पुढील ठळक निष्कर्ष दिसून आले.
शेततळ्यांच्या कामामुळे 29 टक्के लाभार्थींच्या लगतच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे आणि खरीप हंगामात पावसाच्या खंडीत कालावधीमध्ये 37 टक्के लाभार्थींनी शेततळ्यातील पाण्याचा पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी वापर केल्याचे ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ या संस्थेने केलेल्या मुल्यमापनात दिसून आले.
शेततळ्यापासून रब्बी हंगामातील सिंचनात वाढ झाल्याचे 29 टक्के लाभार्थींनी माहिती दिली आहे. रब्बी हंगामात सरासरी 0.76 हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. शेततळ्याच्या मदतीने दुग्धव्यवसाय, पशुपालन, कोंबडीपालन व मत्स्यव्यवसाय यासारख्या शेतीपूरक उद्योगासाठी 15 टक्के लाभार्थींनी लाभ घेतला आहे.
एका शेततळ्यामध्ये सरासरी 1,365 घन मीटर पाणीसाठा उपलब्ध होतो. पुनर्भरण व बाष्पीभवन याद्वारे होणारी घट विचारात घेता साठलेल्या पाण्यापैकी 45 टक्के पाणीसाठा म्हणजेच 615 घन मीटर हा पावसाच्या खंडीत कालावधीत पिकांचे संरक्षित सिंचनासाठी उपलब्ध होतो. एका संरक्षित सिंचनासाठी 1 हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजे 500 घन मीटर पाणीसाठ्याची आवश्यकता भासते. एका शेततळ्यामधून उपलब्ध होणाऱ्या 615 घन मीटर पाणीसाठ्यामधून अंदाजे 1.22 हेक्टर (सुमारे 3 एकर) पर्यंतच्या क्षेत्रास संरक्षण सिंचन देता येते.
शेततळ्यातील पाण्यामुळे 33 टक्के लाभार्थींनी भाजीपाला, फळपीके व चारापिके यासारखी पीके घेऊन पीक पद्धतीत बदल केला असल्याचाही निष्कर्ष या मूल्यमापनातून निघाला आहे.
Share your comments