Sangli News : सध्या हळद काढणी सुरु झाल्यामुळे बाजार समितीत हळदीची आवक सुरु झाली आहे. यामुळे बाजारात हळदीला चांगला दर मिळताना दिसत आहे. तसंच मुहूर्ताच्या हळदीला सांगलीत ३१ हजार रुपयांपर्यत दर मिळला आहे. सांगलीत नवीन हळद सौदा शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्री मदन भाऊ पाटील आणि सांगली बाजार समितीचे सभापती सुजय अशोकराव शिंदे यांच्या उपस्थित पार पडला.
सांगलीत (दि.२) रोजी बाजारात १५८ क्लिंटल हळदीची आवक झाली होती. त्यावेळी हळदीला कमीत कमी १० हजार ५०० रुपये तर जास्तीत जास्त ३१ हजारांचा दर मिळाला आहे. तर सरासरी दर २० हजार ७५० रुपये मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हळद पिकाची देशभरात लागवड केली जाते. तसंच हळदीला औषधी गुणधर्म म्हणून स्थान आहे. यामुळे हळद लागवडीला अनेकांकडून प्राधान्य दिलं जातं. प्रत्येक घरात हळद वापरली जात असून मसाल्यांमध्ये हळदीला प्रमुख स्थान दिलं जातं. हळदीला जेवढे औषधी महत्त्व आहे, तेवढेच धार्मिक महत्त्वही आहे. हळदीला बाजारपेठेत खूप मागणी आहे. त्यामुळं तिला चांगला भाव मिळतो. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या चार राज्यात सर्वाधिक हळद लागवड केली जाते.
दरम्यान, सध्या बाजार समितीत हळदीची अल्प प्रमाणात आवक सुरु आहे. यामुळे सध्या मुहूर्ताची हळद मानली जात असून चांगला दर आहे. फेब्रुवारीच्या मध्यानंतर बाजारात हळद आवक वाढण्याची शक्यता आहे. तसंच हळदीची दर पुढील महिना भर टिकून राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
Share your comments