Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांपाठोपाठ द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. भारतातून बांग्लादेशमध्ये द्राक्ष निर्यात केली जाते. पण आता बांग्लादेशने या निर्यातीवर देखील १०४ रुपये प्रतिकिलोचे आयातशुल्क लावले आहे. यामुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या निर्यात खर्च वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तसंच बांग्लादेशाने द्राक्षावरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने निफाड, दिंडोरी आणि सांगलीमधून द्राक्षाची निर्यात घटली आहे.
दराअभावी शेतकरी चिंतेत
बांग्लादेशने द्राक्षावर आयात शुल्क लावल्यामुळे द्राक्षाचे दर घसरले आहेत. द्राक्षाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. यामुळे उत्पादक शेतकरी रोष व्यक्त करताना दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी आपली बाग उपटून टाकण्यास सुरुवात केली आहे. निफाड तालुक्यातील लासलगावजवळील निमगाव वाकडा येथील शेतकऱ्याने त्यांची बाग उपटून टाकल्याची घटना घडली आहे.
बांग्लादेशने द्राक्षावर आयातशुल्क लावल्यामुळे द्राक्षाला दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दराने द्राक्ष विकावी लागत आहे. मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नाही. तसंच जेव्हा बांग्लादेशला कांद्याची गरज होती तेव्हा केंद्राने कांदा निर्यातबंदी केली. यामुळे आता बांग्लादेशने द्राक्षावर आयातशुल्क लावले आहे, अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांमधून येत आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्यात नाशिकमधून युरोप आणि अमेरिकेत समुद्रामार्ग द्राक्ष निर्यात केली जाते. पण आखाती देशांत सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम या वाहतुकीवर झाला. त्यामुळे जहाज कंपन्यांनी लाल समुद्रामार्गे होणारी वाहतूक बंद केली. त्यामुळे आता आफ्रिकामार्गे द्राक्षनिर्यात करावी लागत आहे. लाल समुद्रामार्गे अठरा ते वीस दिवसांत युरोपात द्राक्ष पोहोचत असत. त्या वाहतुकीसाठी एका कंटेनरसाठी १८०० डॉलर भाडे लागत होते. पण आता ती वाहतूक बंद झाल्यामुळे आता आफ्रिकामार्गे वाहतूक सुरु असल्याने यासाठी पस्तीस दिवस लागत आहेत. त्यामुळे एका कंटेनरचे भाडे तब्बल सहा हजार डॉलर्सवर पोहोचले आहे.
दरम्यान, द्राक्ष उत्पादकांचा निर्यात खर्च वाढल्यमुळे शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. जेथे शेतकऱ्यांना किलोमागे १०० रुपये मिळत होते. तेथे आता त्यांना ७० रुपये मिळत आहेत. यामुळे कंटेनर वाहतुकीसाठी सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाकडून करण्यात आली आहे.
Share your comments