सीताफळ च्या झाडाची मुळे खोलवर न जाता ते वरच्या थरात राहतात त्यामुळे सीताफळाच्या झाडाची योग्य वाढ मिळवण्यासाठी योग्य प्रकारे खतांचे व ओलिताचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. योग्य मशागत ती सहज खतांचे नियोजन केल्यास सीताफळाचे चांगले उत्पादन मिळू शकते.
फळे नवीन व जुनी अशा दोन्ही फुटीवर येतात. त्यामुळे सीताफळाची झाडे नत्राला चांगला प्रतिसाद देतात. सिताफळ चांगल्या उत्पादनासाठी त्याचे ओलित व्यवस्थापन आणि झाडाची वळण व छाटणी याची देखील महत्त्वाची भूमिका असते. या लेखात आपण याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
सिताफळ बागेचे ओलित व्यवस्थापन
सीताफळाच्या झाडांना नियमित पाण्याची गरज नसते. अगदी पावसाच्या पाण्यावर सुद्धा सिताफळाचे चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. परंतु संरक्षित ओलीता शिवाय झाडाला पहिली तीन चार वर्षे उन्हाळ्यात पाणी दिल्यास झाडांची वाढ चांगली होते.त्याप्रमाणेच फळधारणा झाल्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये एक ते दोन पाणी दिल्यास सीताफळाची प्रत व आकार सुधारतो.बाग नांगरून घेतल्यास पावसाळ्यात बागेला जास्त पाणी उपलब्ध होते. उत्पादन निघण्यावर आलेल्या बागांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे विश्रांतीच्या काळात झाडांना 35 ते 55 दिवस पाणी देऊ नये. सर्वसाधारणपणे झाडांची 35 ते 50 टक्के पानगळ झाल्यानंतर झाडांना विश्रांती मिळाली असे समजावे.
सीताफळाच्या झाडाची वळण व छाटणी
- सीताफळाच्या झाडाला योग्य वळण देण्यासाठी वाढीच्या सुरुवातीच्या काळात हलक्या छाटणीची गरज असते.झाडे योग्य वळण देऊन एका बुंध्यावर वाढवली तर झाडे डौलदार वाढतात. अन्यथा अनेक फांद्या असलेले झुडूप तयार होते. यामुळे वाढ कमी होऊन उत्पादन कमी राहते. एक मीटर खोडावरील सर्व फुटवे काढून त्याच्या चारही बाजूने फांद्या विखुरलेल्या राहतील, अशा मोजक्याच फांद्या ठेवाव्यात. जुन्या, वाळलेल्या, अनावश्यक आणि गर्दी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.सीताफळ बागेत भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
- सिताफळ लागवड केल्यानंतर रोपे चार ते पाच महिन्यांत दीड ते दोन फुटाचे झाल्यावर त्याला सहा इंच ठेवून वरील शेंडा कापून टाकावा. नंतर खोडातून येणाऱ्या फांद्यातून फक्त दोन किंवा तीन फांद्या ठेवाव्यात.बाकीच्या फांद्या काढून घ्याव्यात.या फांद्यांना पुन्हा चार ते पाच महिने वाढू द्यावे.
- परत इंग्रजी व्ही आकाराच्या दोन फांद्या प्रत्येक मुख्य फांदीला ठेवून इतर फांद्या काढून टाकाव्यात. म्हणजे जर जून-जुलैमध्ये लागवड केली असेल तर पहिली छाटणी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आणि दुसरी छाटणी मे जून महिन्यामध्ये करावी. अशाप्रकारे छाटणी केल्यास दोन वर्षात 16 ते 24 फांद्यांचे उत्कृष्ट झाड तयार होते.
- नवीन व जुन्या अशा दोन्ही वाढीवर फळधारणा होते. फळधारणा अवस्थेतील झाडांची मे महिन्यात हलकी छाटणी केल्यास जास्त फळे फांदीवर लागतील छाटणी करताना ती खोल किंवा भारी करू नये.छाटणी केल्यानंतर लगेच एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
Share your comments