सध्या मॉन्सून ऋतू चालू आहे, काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने परत एकदा एट्री राज्यात एट्री केली आहे. पावसाळ्यात आपल्या द्राक्ष बागांमध्ये अनेक समस्या पाहण्यास मिळतात. आज आपण अशाच काही समस्याविषयी आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत...
काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस , तर काही ठिकाणी कमी पाऊस झाल तर, ढगाळ वातावरण जास्त काळ टिकून राहिले. अशा परिस्थितीत बागेमधील द्राक्ष वेलीच्या पानांवर काही समस्या आढळतात.
समस्या -
वेळीचा वाढता जोम
बागेच्या दोन ओळींच्या मध्यभागी पाणी साचल्यास तेथे वेलीच्या पांढऱ्या मुळाचे प्रमाण वाढते. ही मुळे अन्नद्रव्ये शोषण्यासाठी कार्यक्षम असतात. ही पांढरी मुळे संजीवकांची निर्मिती करतात आणि ही संजीवके वेलीच्या शेंड्यापर्यंत पोहचतात. परिणामी वेलीचा जोम वाढतो. जर वेलीची वाढ नियंत्रणात असेल तर त्या वेलीतील शरीरशास्त्रीय हालचालींना वेगही नियंत्रणात असतो. म्हणजेच सायटोकायनीनचे प्रमाण जास्त राहून त्या वेलीतील शरीरशास्त्रीय हालचालींना वेगही नियंत्रणात असतो. मात्र पावसामुळे परिस्थिती उलटी असते. यावेळी शेंडा वाढ होत असताना पेऱ्यातील अंतर वाढेल. बगलफुटींची वाढही तितक्याच प्रमाणात होईल. परिणामी काडीची परिपक्कता लांबणीवर जाण्याची समस्या उद्भवते. बगलफुटी वाढल्यामुळे कॅनॉपीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त वाढून डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
या परिस्थीतीत काय करावे
- जमीन वाफसा स्थितीत येईपर्यंत पाणी देण्याचे बंद करावे.
- स्फुरद व पालाशयुक्त खतांची फवारणीद्वारे पूर्तता करावी.
- बगलफुटी त्वरीत काढाव्यात.
- शेंडा पिंचिंग करतेवेळी शेंडा जास्त खुडण्याचे टाळून फक्त टिकली मारावी.
- काडी परिपक्क होत असल्याचा परिस्थितीत फक्त पालाशची फवारणी करुन घयावी.
- फलाधारित डोळ्याच्या जवळ असलेले छोटे पान सुद्धा काढून टाकावे. यामुळे डोळ्यावर एक सारखा सूर्य प्रकाश पडून घडनिर्मितीत अडचण येणार नाही.
समस्या - पानांचा वाट्या होणे
जास्त पाऊ झालेल्या ठिकाणी पानांच्या वाटा झाल्याची समस्या देखील दिसून येते. यावेळी प्रत्येकी काडीवर अर्ध्यापर्यंत पाने जुनी व परिपक्व झालेली दिसतील, तर पुढील भागात कोवळी पाने असतील. बागेतील जमिनीच्या परिस्थितीनुसार, कोणत्या पानाच्या वाट्या होतील, हे ठरेल. ज्या बागेत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी इतर महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचे वहन होण्यामध्ये अडचणी येतात. मुख्यत: पालाश, लोह व मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांचे वहन होत नसल्यामुळे पानांमध्ये कमतरतेची लक्षणे दिसून येतात. अशातच जुन्या पानांवर वाट्या झाल्याटे चित्र दिसून येईल. जुने ते नवीन या दरम्यानच्या अर्ध परिपक्क झालेली पाने पिवळसर दिसून येतील. काही स्थितीमध्ये पानांच्या शिरा गुलाबी ते हिरव्या दिसतील व मध्यभाग पांढऱा ते पिवळसर दिसून येईल. या परिस्थितीमध्ये लोहाची किंवा मॅग्नेशिअमची किंवा दोन्ही अन्नद्रव्यांची कमरता असू शकते. बागेत चुनखडीचे प्रमाण किती जास्त आहे. यावर पानातील कमतरतेची तीव्रता वेगवेगळी असेल.
काय आहेत उपाययोजना, परिस्थितीनुसार वेगवेगळे उपाय
जुन्या पानांवर वाटी झालेल्या परिस्थितीत स्फुरद आणि पालाश युक्त खतांचा वापर फवारणी व ठिबकद्वारे करावा. काडी परिपक्व होत असलेल्या बागेत फक्त पालाशयुक्त खतांचा वापर करावा. यासोबत लोहाची पूर्तता करण्यासाठी फेरस सल्फेट ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा दोन ते तीन फवारण्या करुन घ्याव्यात. तसेच १० ते १२ किलो फेरस सल्फेट प्रतिलिटर एकर याप्रमाणे ठिबकद्वारे द्यावे.
मॅग्नेशिअम सल्फेट ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे दोन ते तीन फवारण्या व जमिनीतून १२ ते १५किलो मॅग्नेशिअम सल्फेट ठिबकद्वारे द्यावे.
जमिनीतील बोदामध्ये ३० ते ४० किलो सल्फर प्रतिएकर या प्रमाणे मिसळून घ्यावे. त्यानंतर २५ ते ३० दिवसांनंतर पुन्हा तितक्याच मात्रेमध्ये सल्फर द्यावे.
नवीन पानाच्या वाट्या झालेल्या असल्यास नवीन फुटीचा शेंडा पांढऱ्या शुभ्र कागदावर आपटून रसशोषक किडी किती प्रमाणात आहेत, याची खात्री करावी. त्यानुसार शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी.
समस्या - पानावर स्कॉर्चिग येणे
पानाच्या कडा जळल्यासारखी लक्षणे आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतात. जुन्या व नव्या अशा दोन्ही प्रकारच्या पानांवर स्कॉर्चिग दिसून येते. बागेत कीटकनाशक, संजीवके, व खतांच्या एकत्रित फवारणी करण्याची चुकीची प्रथा पडली आहे. एकापेक्षा जास्त कोणत्याही घटकांचे मिश्रण करुन फवारणी केल्यास सुसंगतता नसल्यामुळे वापरलेल्या घटकाचे चांगल्या परिणामाऐवजी विपरती परिणाम जास्त होतात. उन्हामध्ये फवारणी केल्यामुळे पर्णरंध्राना इजा झाल्याचेही दिसून येते. रसायनांची तीव्रता, एका पेक्षा जास्त घटकांचा समावेश व फवारणीच्या वेळी वाढलेले तापमान यामुळे पानांवरील पेशींना जखमा होतात. परिणामी तेवढा भाग सुप्त व जळल्याप्रमाणे दिसतो. बागेत चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर इतर अन्नद्रव्याचा पुरवठा खंडित येतो. त्याचाही ताण वेलीला बसतो. अनेक बागा काळा जमिनीत असल्यामुळे तेथे पाऊस झाल्यास जमिनीत पाऊस गेल्यास जेव्हा पानाची लवचिकता वाढते, तेव्हा जुन्या पानावर कोळी किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो. ही कीड पानातून हरितद्र्व्य शोषून घेते.
उपाययोजना
- एकापेक्षा जास्त रसायने किंवा खतांचे मिश्रण करुन फवारणी टाळावी.
- शक्यतो कमी तापमान असलेल्या स्थितीमध्ये फवारणी करावी. यावेळी पानांची रसायने शोषण्याची क्षमता चांगली असते.
- पाऊस सुरू होण्यापूर्वी खरड छाटणीच्या ४५ दिवसांनंतर देठ परीक्षण करुन घ्यावे. सोबत माती परीक्षण करुन घेतल्यास जमिनीची सद्य स्थिती लक्षात येईल. त्यानुसार, आवश्यक त्या अन्नद्रव्याचा पुरवठा करणे सोपे होईल.
- काडीची अनियमित परिपक्वता
काही बागेत काडी परिपक्वतेच्या कालावधीत साधरणपणे पावसाळी वातावरण असते. यावेळी एकतर फुटींची वाढ जोमाने होताना दिसेल. तर काही ठिकाणी काडीची परिपक्कता सुरू झालेली दिसेल. काडी परिपक्व होत आहे, याचा अर्थ सुरुवातीला गुलाबी रंगाची असलेली काडी तळापासून दुधाळ रंगाची होऊन त्यानंतर तपकिरी रंगाची होते. ही पक्वता हळू हळू होत नसून, तळापासून एक एक पेरा पुढे सरकत जाते. म्हणजेच या बागेत काडीच्या परिपक्वतेला कोणतीही अडचण नाही, असे म्हणता येईल. पण पाऊस झाल्यानंतर काही बागेत काडी एकसारखी परिपक्व होत नसून त्याच पेऱ्यातील अर्धा भाग हिरवा, तर बाकीचा भाग परिपक्व दिसेल. किंवा एक पेरा तपकिरी, तर शेजारचा पेरा हिरवा असून पुन्हा तिसरा पेरा परिपक्व झालेला दिसून येईल. याला बोट्रीडिल्पोडिया असे म्हटले जाते.
यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत असते
- खरड छाटणीनंतर या वेलीला पाण्याचा ताण बसला असावा
- जास्त पावसामुळे खराब झाल्याने वेलीला पुन्हा ताण बसला असावा.
- वेलीला पालाशची कमतरता झाली असावी.
- मागील हंगामात वेलीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला असावा.
- यावेळी जास्त पाऊस झाल्यानंतर वेलीला ताण बसला असल्यास अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही.
या स्थितीवर मात कशी द्याल
- ताम्रयुक्त बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणे फवारणी करावी.
- ट्रायअझोल गटातील हेक्झाकोनॅझोल एक मिली प्रतिलिटर किंवा डायफेनोनॅझोल ०.५ ते ०.७ प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
- ट्रायकोडर्मा २ मिली प्रति लिटर प्रमाणे तीन दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या घ्याव्यात. तसेच जमिनीतून चार ते पाच दिवसांच्या अंतराने ट्रायकोडर्मा २ लिटर प्रति एकर प्रमाणे ठिबक द्वारे सोडावे, यामुळे वेलीची रोग प्रतिकारक शक्ती वाढून पुढील समस्या टाळता येतील.
Share your comments