यंदा अधून मधून येणाऱ्या थंडीचे प्रमाण जास्त राहिल्याने केसर आंबा झाडांमध्ये पुनर्मोहोराची प्रक्रिया वेगाने सुरू राहिली. पुन्हा पुन्हा येणाऱ्या मोहोरामुळे झाडाकडून पुरविल्या जाणाऱ्या अन्नाचे विभाजन होऊन आधीच्या मोहोराची फळे गळून पडताना दिसून येत आहेत. फळगळीची ही स्थिती टाळण्यासाठी नवीन मोहोर शक्यतो खुडून टाकावा.
या वर्षी आंबा झाडांना मोहोर आला. सध्या तापमानामध्ये वाढ झाल्याने केसर आंबा झाडांमध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. परिणामी उत्पादन जादा येण्याची शक्यता आहे. भविष्यात हवामान संतुलित राहिल्यास काही ठिकाणी निश्चित उत्पादन वाढण्याची शक्यता दिसत आहे.काही ठिकाणी आंबा फळपिकात आवश्यकतेपेक्षा जास्त फळधारणा झाल्याने संपूर्ण फळांना पोसण्यासाठी क्षमता झाडामध्ये नसते. ही फळगळ रोखण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी फळे गोटी, अंड्याच्या आकाराची असताना केल्यास त्याचा अधिक फायदा होईल.
गळ झालेल्या कैऱ्या ताबडतोब बाजारपेठेत विक्रीसाठी नेणे फायद्याचे ठरेल. सध्याच्या स्थितीमध्ये कैरीचे दर ५ हजार ते ९ हजार रुपये प्रति क्विंटल असे आहेत. तापमान वाढीमुळे सध्या बाजारपेठेमध्ये कैरी चांगला भाव खात असल्याचे दिसते. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा.सद्यःस्थितीत आंबा फळे गोटी ते अंड्यांच्या आकाराची आहेत. त्यांची वाढ होण्यासाठी व गळ थांबवण्यासाठी दर पंधरवड्यातून पाण्याची पाळी योग्य प्रमाणात द्यावी. पाण्याचे संतुलन साधल्यास फळगळ टाळता येईल.आंबा फळे २-३ आठवड्यांची असताना फळांमध्ये इथिलिनचे प्रमाण जास्त असल्याने सुरुवातीच्या काळात फळगळ मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यानंतर निसर्गतः इथिलिनचे प्रमाण कमी होऊन फळगळ कमी होत असल्याचे दिसून येते.
फळांची वाढ होण्याकरिता अन्नद्रव्यांची गरज असते. अन्नद्रव्यांची मात्रा कमी पडल्यास फळांची वाढ खुंटते. परिणामी, फळगळ होण्यास सुरुवात होते. म्हणून कीटकनाशकांच्या फवारणीसोबत २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी झाडावर वाटाणा आकाराची फळे असताना करावी.आंबा फळपिकात फळांच्या वाढीसाठी ऑक्झिन या गटातील संजीवकांची गरज असते. जर झाडांमध्ये संजीवकांची कमतरता असेल तर मोठ्या प्रमाणावर फळांची गळ होते. म्हणून फळांच्या वाढीच्या अवस्थेत नॅप्थेलिक ॲसेटिक अॅसिड (एनएए) २० पीपीएम (२० मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे संजीवकांची फवारणी करावी.
सध्या काही ठिकाणी भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळगळ होताना दिसत आहे. ढगाळ वातावरण, आर्द्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे बागेत करपा रोगाचाही प्रादुर्भाव दिसत आहे. याचे व्यवस्थापन करण्यासाठी हेक्झाकोनॅझोल ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.भुरी व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) ०.३ मि.लि. अधिक सल्फर (८० टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी प्रखर उन्हात करणे टाळावे.
फुलोरा अवस्थेत आंबा पिकात कीटकनाशकांची फवारणी टाळावी. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
Share your comments