बाकी सगळ्या चवी या चार आणि वासाबी या नावानं ओळखल्या जाणार्या पाचव्या प्रकारच्या स्वादांकुरांच्या वेगवेगळ्या प्रकारे साथ देण्याच्या प्रक्रियांमधुन आपल्याला समजतात. या स्वादांकुराशी पदार्थांमधील स्वादरेणुंचा संबंध आला की त्यातुन उठणारे विद्युत रासायनिक तरंग मज्जातंतुकडुन मेंदुतील स्वादकेंद्राकडे पाठवले जातात. त्या तरंगांबरोबरच आपल्या घ्राणेंद्रियांकडुन येणारे अन्नाच्या गंधांचे आणि डोळ्यांकडुन येणार्या अन्नाच्या रंगांचे, आकारांचे तरंग मेंदुला येऊन भिडतात. या सर्वांचं तिथं विश्लेषण होऊन त्यातुन मग त्या पदार्थाच्या खर्याखुर्या चवीची ओळख आपल्याला पटते अर्थात या सार्या प्रक्रिया इतक्या वेगानं होतात की हे सारं सव्यापसव्य होत असल्याची जाणीवही आपल्याला होत नाही.
तरीही यावरुन हे मात्र ध्यानात येईल की केवळ जीभ जे चाखते त्यावरुनच आपल्याला अन्नाची चव कळत नाही. त्यात डोळ्यांना दिसणार्या त्या अन्नाच्या स्वरुपाचा आणि नाकानं जोखलेल्या त्याच्या गंधाचाही तितकाच महत्वाचा सहभाग असतो आंब्याचा रंग काळाकुट्ट आणि त्याचा आकार दगडासारखा ओबडधोबड असता, त्याचा गंध आपल्याला नाक मुठीत धरायला प्रवृत्त करणार्यांच्या जातकुळीतला असता तर आंबा आपल्याला तितकाच चविष्ट लागला असता की काय या प्रश्नाचं उत्तर स्वत:लाच देण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या चवीतल्या जिभेखेरीज इतर इंद्रियांच्या सहभागाचं आकलन होईल.
तेव्हा कोणत्याही अन्नाची चव घेण्यासाठी जिभेबरोबरच आपली नजर आणि घ्राणेंद्रिये तितकीच जागृत असायला हवीत जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपलं नाक चोंदतं म्हणजेच नाकाद्वारे हवा आत शिरायला त्रास होतो. त्याचमुळे आपण अशावेळी तोंड उघडुन श्वासोच्छवास करत असतो नाकावाटे हवा आत शिरत नसल्यामुळे त्या अन्नाचा सुटलेला दरवळ हवेतुन आपण आत घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या गंधांच्या रेणुशी ज्यांचं संघटन जुळायचं त्या नाकातल्या ग्रहणकेंद्रांशी आवश्यक ती प्रक्रिया होतच नाही.
त्यामुळे चव जोखण्यात असलेली आपली भुमिका नाक बजावु शकत नाही. साहजिकच चवीची ओळख पटवुन देण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे मग ते अन्न बेचव असल्याची भावना होते.
Share your comments