उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक अशा कलिंगडाला शास्त्रीय भाषेत ‘सीट्रलस लॅनॅटस’ असे म्हणतात. मूळ आफ्रिकेतील असणारे हे फळ भारतात कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होते. त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत.
कलिंगडामध्ये 90 टक्के पाणी असते. हे खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता येत नाही. सोबत यामध्ये व्हिटॅमिन्स 'ए' आणि 'सी' देखील असतात. कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम हे खनिज असते, जे तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास साहाय्य करते. तसेच कलिंगडामध्ये लायकोपेन नावाचे एक बायोफ्लेनेवॉईड असते. लायकोपेन हे एक अतिशय उत्तम ॲन्टिऑक्सिडन्ट आहे, जे रक्तामध्ये वाढलेल्या घातक फ्री-रॅडिकल्सना कमी करुन कॅन्सरचा धोका कमी करते.
औषधी गुणधर्म:
कलिंगड हे अल्कली गुणधर्माचे फळ आहे. त्यामुळे आम्लतेने निर्माण होणाऱ्या आजारांवर ते उपयोगी पडते. उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील जलउत्सर्जन मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे शरीरातील खनिजे घामाद्वारे निघून जातात. पर्यायाने अशा वेळी थकवा जाणवतो. त्या वेळी कलिंगड खाल्ल्याने तहान भागते व घामाद्वारे शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा ऱ्हास भरून येतो. कलिंगडाच्या बियांचा उपयोग शक्तिवर्धक म्हणून केला जातो. यातील साखर सहज पचून रक्तामध्ये मिसळत असल्याने ते आरोग्यपूर्ण आहे. कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे. त्याची साल, फळ व बी या तिघांचाही उपयोग केला जातो. कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर व लघवीला जळजळ होत असेल तर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो.
कलिंगड आणि आजारावर उपाय
- मूतखडा झाला असेल तर तो लघवीतून पडून जाण्यासाठी कलिंगडाचा रस सतत काही दिवस द्यावा.
- आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर पित्त कमी करण्यासाठी कलिंगड खावे.
- कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते. लायकोपिन अॅण्टिऑक्सिटेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.
- कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आर्द्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते.
- उष्माघातामुळे शरीराची आग होत असेल तर तसेच उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असेल तर कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. थोडय़ाच वेळात शरीराची आग कमी होते.
- सौंदर्यवर्धनासाठीही कलिंगड उपयुक्त ठरते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरचा तजेला वाढतो.
- कलिंगडाचे बी हे अतिशय पौष्टिक व चवदार असते. मुखशुध्दीसाठी बडिशेपमध्ये कलिंगडाचे बी वापरावे तसेच घरी बनवलेले लाडू, बर्फी यामध्येही या बीचा सजावटीसाठी वापर करावा. यापासून केलेले तेल हे पौष्टिक असते. त्याच्याही खाद्यपदार्थ म्हणून वापर करता येतो.
- कलिंगडाचे बी टणक असल्यामुळे सोलायला कठीण असते. म्हणून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे व त्याचा रस गाळणीतून गाळून घ्यावा व हे गाळलेले पांढरे दूध रस्याच्या भाजीत किंवा आमटीत घालावे. या बियांमध्ये प्रथिने, क्षार व शरीरास उपयुक्त असा मेद भरपूर प्रमाणात असतात व त्याचा आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो.
- कलिंगडाचा लाल गर काढल्यानंतर, सालीचा पांढरा गर हा फेकून न देता त्याचा वापर कोशिंबीर, थालीपीठ, कटलेट, भजी, धिरडे, भाजी यांमध्ये करावा.
- कलिंगडाची हिरवी साल स्वच्छ धुऊन बारीक किसून सांडगे बनविण्यासाठी वापरावी यामध्ये लोह, चोथा व ‘ब’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.
लेखक:
साखरे के. एस, डॉ. अ. र. सावते व डॉ. रा. ब. क्षिरसागर
अन्न अभियांत्रिकी विभाग
अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
Share your comments