भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीची पाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात. मेथीचे बीज फारच कडू असते, त्यास भाजून त्यातील कडूपणा कमी करता येतो. मेथीची पाने कणकेत मिसळून पराठे, ठेपले असे पदार्थ केले जातात.
मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो. मेथीमध्ये थियामिन, फॉलिक एसिड, रिबोफ्लाव्हिन, नियासिन, जीवनसत्त्वे ए, बी 6 आणि सी सारख्या जीवनसत्त्वे असतात, तसेच तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलेनियम, जस्त, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांचे समृद्ध भांडार आहे. मेथीचे दाणे जीवनसत्त्व के चा समृद्ध स्रोत आहे. जे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरतात.
100 ग्रॅम मेथीमधील पोषक तत्व खालीलप्रमाणे आहेत
- कॅलरी: 50
- कर्बोदके: 58 ग्रॅम
- चरबी: 6 ग्रॅम
- सोडियम: 67 मिलीग्रॅम
- पोटॅशियम: 770 मिलीग्रॅम
- प्रथिनेः 23 ग्रॅम
- लोह: 186%
- जीवनसत्त्व बी 6: 30%
- मॅग्नेशियम: 47%
मेथीचे आरोग्यदायी फायदे:
- मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते. मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईडल सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईडचे शोषण टाळले जाते.
- ह्रदयविकाराचा धोका कमी होतो. मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे हृदयाचे आरोग्य नियंत्रित राहते.
- रक्तातील साखर नियंत्रित राहते मधूमेहींनी मेथीची पाने आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
- पचनप्रक्रिया सुलभ होते. मेथीमध्ये फायबर व भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व पचनास मदत होते.
- सकाळी उठल्यावर मेथीचा उकळलेला अर्क घेतल्यास पचनप्रक्रिया सुलभ होते.
- छातीत जळजळ होत असल्यास आराम मिळतो.
- वजन कमी करण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो-मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक फायबरमुळे ते दाणे पोटात फुगतात व भूक कमी लागते.
- ताप व घसा खवखवणे यावर गुणकारी. ताप असल्यास मेथी एक चमचा लिंबू व मधासोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो. तसेच खोकला असल्यास त्यावर देखील मेथी गुणकारी आहे.
- स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दुधाचे प्रमाण वाढते. मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकामुळे आईच्या दूधाच्या प्रमाणात वाढ होते.
- बाळाचा जन्म सुलभ होतो. मेथीच्या सेवनामुळे बाळाच्या जन्माच्यावेळी गर्भाशयाच्या आकुंचन व प्रसरणाला मदत होते. त्यामुळे प्रसववेदना कमी होतात. मात्र अधिक प्रमाणात मेथी सेवन केल्यास गर्भपात होण्याचा धोका असल्यामुळे गर्भवती महीलांनी मेथीचे सेवन करताना सावध रहावे.
- महिलांच्या मासिक पाळीमधील समस्या कमी होतात, मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन, आयसॉफ्लॅवेन्स, एस्टोजिन या घटकांमुळे मासिक पाळीमध्ये आराम मिळतो. मासिक पाळीच्या काळामध्ये तसेच गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होते. आहारात मेथीच्या भाजीचा वापर केल्याने शरीराला पुरेसे लोह मिळते.
- कोलनकॅन्सर टाळता येतो. मेथीमधील फायबर या घटकांमुळे अन्नातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे कोलन कॅन्सर टाळण्यास मदत होते.
- त्वचेचा दाह अथवा चट्टे कमी होतात मेथीमधील जीवनसत्त्व सी या एन्टीऑक्सिडंटमुळे त्वचेचा दाह कमी होतो.
- त्वचा विकार कमी होतात. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, पिंपल्स, सुरकुत्या कमी करण्यासाठी मेथीचा फेसपॅक लावल्यास चांगला फायदा होतो.
- केसांच्या समस्या कमी होतात. मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात.
इतर वापर:
- मेथीची वाळलेली पाने नैसर्गिक कीटकनाशक म्हणून धान्य साठवणूकीत वापरतात.
- उत्तर आफ्रिकेच्या काही भागामध्ये, मेथीचे दाणे साखर आणि शुध्द तेल यांच्या मिश्रणात वजन वाढविण्यासाठी खातात.
- अनेक पाश्चात्य देशांमध्ये अद्यापही पशुवैद्यकीय औषधे म्हणून मेथीचा वापर केला जातो.
जोशी मोनाली मोहनराव, डॉ.डी.एम.शेरे व शिंदे एकनाथ मुंजाजी
(अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग,अन्नतंत्र महाविद्यालय,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी)
Share your comments