अळीव एक पोषक अन्नपदार्थ

Saturday, 08 September 2018 01:41 PM


वैद्यकशास्त्र कितीही प्रगत झाले असले तरीही आज सुद्धा सजग जनता आपल्या आहारातून आरोग्याची काळजी आणि आजारांपासून स्व रक्षण करण्यास महत्व देतात. अनेक अन्नपदार्थ आहेत ज्यांना पोषणमूल्यांबरोबर काही औषधी गुणधर्म असतात. या अन्नपदार्थात अळीव एक अशीच वनस्पती किंवा तेल बी किंवा धान्य आहे. अनेक औषधी गुणधर्मांनीयुक्त असलेली अळीव विविध नावांनी विविध भाषेत परिचित आहेत, संस्कृत मध्ये चांदशूर, आंग्ल भाषेत गार्डन क्रेस, हिंदी मध्ये चाणसूर किंवा हलिम असे म्हणतात. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमधून प्रामुख्याने अळिवाचे उत्पादन घेतले जाते.

अळीव वनस्पती सुमारे १.५ ते २ फूट उंची इतके वाढते, थंडीच्या दिवसात या वनस्पतीची वाढ चांगली होते. कोणत्याही प्रतीच्या जमिनीत याचे उत्पादन घेणे शक्य आहे. वर्षभर या वनस्पतीची काढणी शक्य आहे आणि एका हेक्टर पासून सुमारे ६ टन पर्यंत उत्पादन मिळते. हायड्रोपोनिक शेतीसाठी हे चांगले पीक होऊ शकते. या वनस्पतीच्या मुळांचा, पानांचा आणि बियांचा वापर अनेक प्रकारे खाण्यासाठी केला जातो. 

अळिवाच्या बिया आकाराने लहान, लांबुळक्या, अंडाकृती, टोकदार आणि त्रिकोणाकृती असतात. रंगाने लालसर किंवा तपकिरी, सुमारे ३ ते ४ मिलीमीटर लांब, १ ते २मिलीमीटर रुंद असते. अळीव वनस्पतीच्या पानांचा उपयोग कोशंबीर, सलाड किंवा भाजी बनवून खाऊ शकतो. अळिवाच्या पानांचा रस काढून त्या पासून आरोवर्धक पेय बनवू शकतो.

अळिवातील पोषण मूल्य भरपूर असून त्यात सुमारे २२.५% ते २६.३२% प्रथिने, २७.५% स्निग्धांश, ७% तंतुमय रेषे, ३०% कर्बोदके आणि ४७५ किलो कॅलोरीज इतकी ऊर्जा मिळते. शिवाय कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, झिंक, क्वापर, मँगॅनीज आणि पोटॅशिअम,असे खनिज २५३.४६ मिलिग्रॅम, ४१८.३५ मिलिग्रॅम, ६.४८मिलिग्रॅम, २.३७ मिलिग्रॅम, २.३१ मिलिग्रॅम, १.५२ मिलिग्रॅम आणि ११९३ मिली ग्राम प्रति १०० ग्राम या प्रमाणात अनुक्रमे असल्याचे संदर्भ आढळतात.

एकूण स्निग्धांश पैकी ४६.८% पुफा (अनेक असंतृप्त स्निग्ध आम्ल) प्रकारातले आणि ३७.६% मुफा (एक असंतृप्त स्निग्ध आम्ल) असतात. ओलिक, लिनोलिनीक आणि लिनोलिक ऍसिड हे प्रमुख स्निग्ध आम्ल असतात. आहारात अशा प्रकारच्या स्निग्धांशाचे सेवन हे आरोग्यास फायदेशीर असते.

अळिवाच्या बिया भाजून विविध अन्नपदार्थात अंतर्भूत करून आहारात समाविष्ट करता येऊ शकते. अळिवाच्या बिया भाजून शेंगदाणा, तीळ सोबत चिक्की बनवून खाल्यास फायदेशीर ठरेल, अळिवाचे लाडू हा एक पारंपरिक अन्नपदार्थ आहे. शिवाय विविध बेकरी पदार्थात अळीव समाविष्ट करणे अशा पदार्थांचे मूल्यवर्धन करण्यास फायद्याचे ठरेल.

डायरिया, कफ, अस्थमा अशा आजारांवर अळीव उपयुक्त आहे. पोटातील वायू दूर करण्यास, डाययुरेटिक, शक्तिवर्धक असे अनेक गुणधर्म अळिवास आहेत. बाळंत स्त्रियांमधील दुधाचे प्रमाण वाढवण्यास अळीव आणि अळिवाचे पदार्थ फायदेशीर ठरल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. अळिवात म्युसिलेज सारखा चिकट पदार्थ अधिक प्रमाणात असल्या मूल्ये बद्धकोष्ठ, मधुमेह, कोलेस्टेरॉल या साठी उपयुक्त आहे. अळिवातील लोहामुळे रागातील हिमोग्लोबीन लवकर वाढण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदोषामुळे होणारे त्वचारोग, अनेमिया या सारख्या व्याधींसाठी अळीव सेवन उपयुक्त ठरू शकते. अळीव गर्भसंयोजक असल्यामुळे गर्भवती महिलांनी अळिवाचे सेवन करू नये.

प्रा. सौ. एस. एन. चौधरी
(के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

garden cress nutritive oil seed aliv अळीव पोषक अन्नपदार्थ तेलबिया food

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.