1. आरोग्य सल्ला

गुणकारी कुळीथ / हुलगा

कुळीथास हुलगे असेही म्हणतात. याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम (horse gram) कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही. खरंतर स्थूल व्यक्तींसाठी हे फायद्याचे कडधान्य आहे. सर्व कडधान्यांच्या तुलनेत कुळथांमध्ये सर्वांत कमी चरबी आहे व त्याचबरोबर त्यातील चोथ्याचे प्रमाण अधिक आहे. कुळीथ हे सामान्यत: घोड्यांचे पालन करण्यासाठी आहार म्हणून वापरले जाते.

KJ Staff
KJ Staff
horse gram

horse gram

कुळीथास हुलगे असेही म्हणतात. याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम (horse gram) कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही. खरंतर स्थूल व्यक्तींसाठी हे फायद्याचे कडधान्य आहे. सर्व कडधान्यांच्या तुलनेत कुळथांमध्ये सर्वांत कमी चरबी आहे व त्याचबरोबर त्यातील चोथ्याचे प्रमाण अधिक आहे. कुळीथ हे सामान्यत: घोड्यांचे पालन करण्यासाठी आहार म्हणून वापरले जाते. पारंपारिक आयुर्वेदिक पाककृतीमध्ये कुळीथ औषधी गुणांसह अन्न म्हणुन वापरले जाते. कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हलके असतात.

शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात व कफ दोष कमी करतात. कावीळ झालेल्या रुग्णासठी व वजन कमी करणाऱ्या आहाराचा भाग म्हणून  कुळीथाला निर्धारित केले आहे. कुळीथाचे मुख्यत्वे भारतात उत्पादन घेतले जाते. तसेच श्रीलंका, मलेशिया, वेस्ट इंडीज इ. मध्ये देखील घेतले जाते. भारतात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उडीसा, तमिळनाडु, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि पाय टेकड्यांमध्ये हे पिक घेतले जाते. कुळीथाच्या वैद्यकीय वापरावर चर्चा केली गेली आहे. कुळीथ हे प्रथिने आणि इतर पोषक घटकांचा संभाव्य स्रोत म्हणून ओळखले गेले आहे. तसेच हे लोह, मॉलिब्डेनम आणि कॅल्शियमचे उत्कृष्ट स्रोत देखील आहे.

हेही वाचा :वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे इसबगोल

100 ग्रॅम कुळिथामधील पोषक तत्त्वे:

  • कर्बोदक 57.2%
  • प्रथिने 22%
  • तन्तुमय पदार्थ 5.3%
  • स्निग्ध पदार्थ 0.50%
  • खनिज 3.2 ग्रॅम
  • कॅल्शियम 287 मि.ग्रॅ
  • फॉस्फरस 311 मि.ग्रॅ
  • लोह 6.77 मि.ग्रॅ
  • कॅलरीज 321 कि.कॅलरी
  • थिअमीन 0.4 मि.ग्रॅ
  • रिबोफ्लाव्हिन 0.2 मि.ग्रॅ 
  • नियासिन 1.5 मि.ग्रॅ इत्यादी पोषक घटक आहेत. (संदर्भ-Nutritive Value of Indian Foods- NIN, ICAR, Hyderabad). कुळीथामधे स्निग्ध पदार्थचे प्रमाण कमी आहे तसेच ते प्रथिने, आहारातील तंतूमय पदार्थ, विविध सूक्ष्म पोषक घटक आणि उपयोगी रसायनाचा उत्कृष्ट स्त्रोत आहे.

कुळीथाचे आरोग्यदायी फायदे:

  • आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी पथ्यकारक मानले आहे. तसेच लघवीच्या विकारांमध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्‍तींना देण्याची प्रथा आहे. पूर्वी बाळंतिणीना कुळथाचा काढा दूध वाढण्यासाठी दिला जायचा.
  • आयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकर सांगितलेले आहेत. पण डोळ्यांवर थेट याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा.
  • कुळीथ हे वातघ्न, कफघ्न आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पथ्यकर आहे. सुजेवरही त्याचा उपयोग होतो.
  • उन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पित प्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये. कुळथामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे. परंतु यातील काही घटकांमुळे (oxalates) यातील कॅल्शियमच्या शोषणाला अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्‍तींना calcium oxalates असलेले मुतखडे आहेत अशांनी कुळीथ खाऊ नये.
  • लोहाची कमतरता दूर करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते तसेच हिवाळा हंगामात शरीराचे तपमान राखण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते.
  • कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे.
  • शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
  • कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते.
  • अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.
  • मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.
  • प्रक्रिया न केलेले कच्चे कुळीथ बियाणेमध्ये असे गुण आहेत जे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करतात.
  • पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथाचा चांगला उपयोग होतो. पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो.
  • त्वचेची आग, पुरळ व फोड दुर करण्यासाठी कुळीथाची पावडर पाण्याबरोबर घेणे उपयुक्त ठरते. त्वचेच रंग उजळविण्यासाठी त्वचेवर कुळीथ बियाणे पेस्ट करून लावावे.
  • खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा.
  • कुळीथ हे फेरूलीक, क्‍लोरोजेनिक, कॅफिइक, व्हॅनिल आम्ल जेनेस्टीअन आणि माल्वीडीन वनस्पतीजन्य रसायनयुक्त आहे. यामुळे कुळीथ स्निग्ध पदार्थांना अटकाव करतो आणि वजन कमी करण्यात याची मदत होते.
  • कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून प्यायल्यास हे एक नैसर्गिक मूत्रल द्रवासारखे उपयोगी आहे. मूतखडा बाहेर घालविण्यास मदत होते. मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते, सूज कमी करते.
  • अंगातील ताप कमी करते. सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळिथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.
  • कुळीथाच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात.
  • या कडधान्यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टळते. कुळीथामधील शर्करा त्वरित रक्तामध्ये वाढल्यामुळे तृप्ती वाढते. पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार खाल्ले जात नाही, त्यामुळे वजनही वाढत नाही, मधुमेहींनाही उपयोगी आहे

हेही वाचा :सेंद्रिय पदार्थांचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

कुळीथाचे वेगवेगळे प्रकार आपण स्वयंपाकामध्ये करतो त्याचे शरीरावर होणारे परिणाम पाहूयात:

  • कुळीथ+भात खिचडी:
    चवीला गोड, तुरट, रूक्ष, उष्ण, तृप्तीदायक, भुक वाढविणारी, पचायला हल्की, वातकफ नाशक व पित्तकर असते.
  • कुळीथ कट:
    चवीला गोड, तुरट, उष्ण, वात पोटातून पुढे सरकवणारा, वात कफ नाशक, भुक वाढविणारा, मेदाचा नाश करणारा, लघवी सुटायला मदत करतो तसेच किडनी स्टोन मध्ये घेतल्यास पथ्यकर आहे.
  • कुळीथ सूप:
    तुरट, वातनाशक, कफनाशक, पित्तकर, रक्तवाढविणारा, पचायला हलके, उष्ण असते.
  • कुळीथ पीठले:
    पचायला हलके, वात कफ नाशक, पित्तकर, वात पुढे सरकवणारे, भुक वाढविंणारे, उष्ण असून चवीला तिखट, तुरट असते.
  • कुळीथाची गोड पिठी:
    पचायला जड,वातनाशक, कफ व पित्त वाढविणारी, उष्ण, शक्तिवर्धक, धातुवर्धक, तृप्तीदायक, चवीला तुरट गोड असते. कुळीथ अतिप्रमाणात खाल्ल्यास रक्तपुष्प होते व एसीडीटी होते. कुळीथ खाऊन अजीर्ण झाल्यास खडीसाखर खावी.

पटांगरे सुवर्णा, कुंती कच्छवे, डॉ. व्ही. एस.पवार
(अन्न तंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

English Summary: Curative Horse Gram Published on: 12 April 2019, 10:42 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters