सध्या परिस्थितीत आपण सगळीकडे पाहत आहोत की, तरुणांची एक घालमेल आणि घुसमट फार मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. दरवर्षी निरनिराळ्या प्रकारच्या पदव्या घेऊन तरुण लाखोच्या संख्येने बाहेर पडत आहेत परंतु त्या तुलनेने नोकऱ्यांचे प्रमाण किंवा रोजगार निर्मिती ही फार कमी प्रमाणात होताना दिसत असल्याने खूप मोठ्या संख्येत तरुण बेरोजगार आहेत.
जर आपण नोकऱ्यांचा विचार केला तर खूप दयनीय स्थिती असून अवघ्या शंभर ते दोनशे रिक्त जागांची भरती निघाली तरी पन्नास हजारांपर्यंत अर्ज दाखल होतात.
यावरून बेरोजगारीची समस्या किती भयानक स्वरूप धारण करत आहे याचा अंदाज लावता येणे शक्य आहे. दुसरी गोष्ट व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे व्यवसाय करण्यामागील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे भांडवल उभे करणे खूप जिकिरीचे असते.
त्यामुळे बेरोजगार तरुणाची सध्याची स्थिती खूपच वाईट आहे. अशा परिस्थितीत सरकार विविध योजनांच्या माध्यमातून अशा युवकांसाठी विविध उपक्रम राबवून मदत करत असते.
या पार्श्वभूमीवर अशा ग्रामीण भागातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
तुम्हाला घ्यायचा आहे लाभ तर अशा प्रकारे करा अर्ज
ग्रामीण भागातील युवक स्वतःच्या पायावर उभे राहावेत व त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने त्यासाठी https://www.pmegp.online/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवले असून याचा लाभ नक्कीच युवकांनी घ्यावा.
किती मिळणार कर्ज?
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत देण्यात येणारे हे कर्ज उत्पादन क्षेत्रासाठी 50 लाख रुपये, सेवा क्षेत्रासाठी वीस लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा लाख आणि पंचवीस लाखांपर्यंतचे कर्ज या माध्यमातून दिले जाणार आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालय आहे त्या ठिकाणी संपर्क साधावा.
Share your comments