Mumbai News : राज्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत, असे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांनी दिले. मुंबईतील शासकीय निवासस्थानी रोजगार हमी योजनेच्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणी विषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपसचिव संजना खोपडे उपस्थित होते. यावेळी भुमरे म्हणाले की, राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली आहेत. काही भागात पाऊस असल्याने कामांना सुरुवात झाली नसेल, तर ती कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत. ज्या ठिकाणी काही समस्या निर्माण होत आहेत त्यांनी शासनाकडे तत्काळ मार्गदर्शन मागवावे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मंजूर कामे पुढील आठवड्यात सुरु करुन त्याचा अहवाल द्यावा अशीही सूचना मंत्री श्री भुमरे यांनी केली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पडोळ, गट विकास अधिकारी नम्रता जगताप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून बेरोजगार आणि गरजू लोकांना रोजगार पुरविला जातो. यामुळे नागरिकांना कुटुंब उदारनिर्वाह करण्यास मदत होते. तसंच राज्यात मोठ्या प्रमाणात या योजनेतंर्गत कामे सुरु आहेत.
दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यामागे (मनरेगा) कामाच्या अधिकाराची हमी देण्याचा चांगला उद्देश आहे. हा एक भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे. जो २३ ऑगस्ट २००५ रोजी पारित करण्यात आला होता.
Share your comments