Government Scheme Update
पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याबरोबर 'नमो शेतकरी सन्मान योजने'चा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र केंद्राचा १४ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. परंतु राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणार नमो सन्मान योजनेचा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. नमो योजनेचे पैसे कधी नेमके मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली. परंतु राज्य सरकारने निधीची तरतूद करून देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. केंद्राकडून पीएम-किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाते. या अंतर्गत दर महिन्यानंतर शेतकऱ्यांना २ हजार रुपये दिले जातात. त्याच धर्तीवर ‘नमो किसान’योजना राबविण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न झाला आहे. पण पहिल्याचा हप्ता लांबवणीवर गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने नमो योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विलंब झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑगस्टच्या काही दिवसात योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळावा,अशी इच्छा शासनाची होती. या महिन्याच्या अखेरपर्यंत योजना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने सॉफ्टवेअरच्या अंतिम चाचण्यांसाठी ‘महाआयटी’ची धावपळ सुरू आहे,”अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यातील जवळपास ८६ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ‘नमो’ योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे. दर चार महिन्यांनंतर प्रतिहप्ता दोन हजार रुपयांप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेला लवकरात लवकर अंमलात आणण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
Share your comments