मुंबई - प्रतिक्षा काकडे प्रतिनीधी
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवतं आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हिताचा विचार केला जातो.अलिकेडच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.परंतु काही शेतकरी अद्यापही यापासून वंचित राहिले आहेत. तर राज्यातील तब्बल १२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला नाही.
काही कागदोपत्री त्रुटींमुळे शेतकरी या १४ व्या हप्त्यापासुन वंचित राहिले होते. त्यामुळे यापुढे राज्यातील शेतकरी हक्क्याच्या योजनेपासून वंचित राहू नये. यासाठी राज्यात १५ ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभाागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या आर्थिक लाभ घेण्यास राज्यातील तब्बल ९७ लाख शेतकरी पात्र असून १२ लाख शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लाभ न मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी, असे आदेश कृषी विभागाच्या सचिवांना दिले आहेत. त्यामुळे या १२ लाख शेतकऱ्यांना यापुढे लाभ घेता मिळणार आहे.
कोणत्या कारणांमुळे शेतकरी राहिले वंचित?
१)भूमी अभिलेख अद्ययावत नसणे
२)ई-केवायसी नसणे
३)बँक खात्याला आधार संलग्न नसणे
या तिन्ही प्रकारच्या नोंदणी करण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे.
दरम्यान, हप्ता न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना शोध घेऊन त्यांच्या तिन्ही अटींची पूर्तता गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवकांकडून करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. मोहीम यशस्वी झाल्यास राज्यातील या १२ लाख शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो किसान सन्मान योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रयत्न करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच जे पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी संनियंत्रण समितीशी संपर्क करून आपले केवायसी व अन्य अटींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.
Share your comments