समाजातील आर्थिक दुर्बल उत्पन्न घटकातील नागरिकांकरिता अनेक प्रकारच्या आवास योजना राबवल्या जातात. जेणेकरून अशा नागरिकांचे स्वतःचे पक्के घर असावे. उदाहरणच घ्यायचे झाले तर महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात येणारी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि नुकतीच घोषणा करण्यात आलेली मोदी आवास योजना यासारख्या योजनांचा समावेश करता येईल.
अशा योजनांच्या माध्यमातून नागरिकांना घर बांधण्याकरिता आर्थिक मदत करण्यात येते. त्यामुळे समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या आणि हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जून 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री आवास योजना देखील एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, कमी उत्पन्न गट आणि मध्ये उत्पन्न गटांकरिता घर बांधणी किंवा नूतनीकरणाकरिता आर्थिक मदत देते. तसंच या योजनेत घर बांधण्यासाठी जर गृह कर्ज घेतले तर व्याज अनुदान देखील दिले जाते.
प्रधानमंत्री आवास योजना
केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वपूर्ण योजना असून समाजातील सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी आणि चांगली घरे विकसित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून चांगले घर बांधण्याकरिता आर्थिक मदत दिली जाते तसेच गरीब लोकांकरिता गृहकर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते. ही योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांकरिता लागू आहे.
या योजनेसाठी आवश्यक पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आहेत त्या म्हणजे या योजनेमध्ये जो अर्जदार असेल त्याकडे स्वतःचे पक्के घर नसावे. तसेच आधार कार्ड असणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे ज्या कुटुंबाच्या घरात एक किंवा दोनच खोल्या आहेत आणि त्याची भिंत आणि छप्पर कच्चे आहे. तसेच ज्या कुटुंबामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त वयाची शिकलेली व्यक्ती कुठल्याही कामात व्यस्त नाही म्हणजेच बेरोजगार आहेत.
तसेच ज्या कुटुंबामध्ये 16 ते 59 वयोगटातील एकही पुरुष कार्यरत सदस्य नाही, यासोबतच शारीरिक दृष्ट्या सक्षम नसलेली आणि अपंग सदस्य असलेली कुटुंबे व भूमीहीन कुटुंब इत्यादी पात्रता पूर्ण करणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
लागणारे कागदपत्र
या योजनेचा अर्ज करण्याकरिता आधार कार्ड, अर्जदाराचे ओळखपत्र तसेच अर्जदाराचे बँक खाते आधार क्रमांक जोडलेले असणे गरजेचे आहे. पासपोर्ट फोटो आणि मोबाईल नंबर आवश्यक असतो.
Share your comments