चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही या कार्यालयाचे अंतर्गत प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करीता जिल्हा प्रशासनाने निधी उपलब्ध करून दिला होता. अन्नसुरक्षा दल स्थापन करणे या प्रकल्पा अंतर्गत घेण्यात आलेले प्रशिक्षण व प्रात्यक्षिक, त्याचा शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसार झाला. यंत्र शेतकऱ्यांना आवडले, त्याची उपयुक्तता पटली आणि यादव खुशाल बालपांडे रा. रूई, ता. ब्रम्हपुरी, प्रवीण थूल या शेतकऱ्यांनी यंत्र खरेदी केले. या यंत्राद्वारे पेरीव धानाची पेरणी करणार आहेत.
डायरेक्ट पॅडीसीडर वापरतांना रोपवाटीका तयार करण्याची गरज नाही. चिखलणी केल्यानंतर एक दिवस चिखल जमु द्यायचा व त्यानंतर त्यात सरळ अंकुरीत धान पेरणी करता येतात. उगवणपूर्व तण नाशकांचा वापर केला तर तणांचे सुध्दा व्यवस्थापण करता येते. तसेच ओळीत पेरणी असल्यामुळे डवरण करता येते. ज्या शेतकऱ्यांना वरील अडचणी येत असतील त्यांनी हे यंत्र वापरण्यास हरकत नाही.
डायरेक्ट पॅडी सीडर वापराचे फायदे:
- मजुरांवरील खर्च कमी होतो. रोवणी करीता रोपे तयार करणे, रोपे काढणे, मुख्य शेतात पसरविणे व रोवणी करणे इत्यादी कामावरील हे. रू.6 हजार 300 खर्चात बचत होते. बी सारखे पेरले जाते व हेक्टरी झाडांची संख्या योग्य राखले जाते. एकसारखी पेरणी केली जाते.
- हेक्टरी बियाणे व विरळणीचे खर्चात बचत होते. पिक रोवणी केलेल्या धानापेक्षा डायरेक्ट पॅडीसिडरणे पेरणी केलेले पिक 7 ते 10 दिवस लवकर परिपक्व होते व काढणीस येतो. डायरेक्ट पॅडीसीडर वजनाने हलके असल्यामुळे हाताळणी करण्यास सोपे असते. एक दिवसात एक हेक्टर क्षेत्र पेरणी केले जाते.
डायरेक्ट पॅडी सीडरची विशेषता:
हे यंत्र हाताने म्हणजेच मानवाने ओढून वापरावे लागते. या यंत्राने पेरणी करतांना धानाच्या दोन ओळीतील अंतर 20 सें.मी. राखले जाते. डायरेक्ट पॅडीसीडर या यंत्राने एकावेळी 8 ओळी धान पेरल्या जातो व दोन ओळीतील अंतर 20 सें.मी. असते.
पेरणीची पध्दत:
यंत्राची सर्वभागांची जोडणी केल्यानंतर अंकुरीत बियाणे ड्रममध्ये भरावे. पेरणी करतांना प्रत्येक वेळी 2,3 ड्रम बियाणे भरावे. ड्रम 2,3 भरल्यानंतर ड्रमचे झाकण निट बंद करावे. त्यानंतर डायरेक्ट पॅडीसिडर मानवी शक्तीने चिखलावर ओढावे. चालतांना पेरणी 1 कि.मी. प्रति तास ठेवावी. पेरणी करतांना पाठीमागे सुध्दा लक्ष ठेवावे. चिखलावर चालतांना यंत्राची चाके उमटतात त्यांचा पुढील पेरणीसाठी मार्कर म्हणून वापर करावा. पहिले फेरीचे वेळी जिथून चाकगेले असेल त्याच मार्कर वरून पुढचे फेरीत पेरणीचे चाक जाईल याची काळजी घ्यावी व 20 सें.मी.अंतर दोन ओळीत राखले जाईल. अधूनमधून ड्रमचे छिद्रामधून बियाणे निटपडते की नाही ते तपासावे. जेव्हा ड्रम मधील बियाणे 1,4 राहते तेव्हा परत ड्रममध्ये बियाणे भरावे (2,3 ड्रम) व पेरणी सुरू ठेवावी.
शेत तयार करणे:
- शेतात चिखलणी करून सपाट करणे करीता फळी फिरवावी. चिखलावर पाणी असल्यास 24 तासपूर्वी काढून घ्यावा व चिखल स्थिर होवू द्यावा. चिखल 1-2 दिवस जुना असावा. चिखलावर अतिशय पातळथर पाणी असणे गरजेचे असते. जास्तीचे पाणी काढून टाकावे.
- धान पिकाकरीता माती परीक्षणावर आधारीत 50 टक्के नत्र, 100 टक्के स्फुरद व पालाश प्रतीहेक्टर चिखलावर द्यावे. पेरणी नंतर तीन दिवसाच्या अंतराने शेतात पाणी भरावे व लगेच काढून टाकावे. हे 12 दिवस पर्यंत करावे व नंतर रोपांची उंची बघून पाणी पातळी राखावी.
डायरेक्ट पॅडी सीडर वापरतांना घ्यावयाची काळजी:
- कल्टीव्हेटरने जमीन नांगरावी. धान पेरणीकरीता शेतात पाणी भरून चिखलणी करावी. प्लाउने नांगरटी करु नये. प्लाउने नांगरट केल्यास चिखल करतांना खोल चिखल तयार होतो.
- खोल चिखल असल्यास ड्रम सिडरची चाके खोल जातात. त्यामुळे गोल फिरणाऱ्या ड्रमला चिखल लागतो व ड्रमवर अंकुरीत बियाणे पडण्याकरीता असलेले छिद्र चिखलाने बंद होतात. परिणामी, ड्रममधून पडणारे बियाणे चिखलाला चिटकते व छिद्र बुजल्यामुळे पेरणी निट होत नाही. पेरणी विरळ होते, हेक्टरी झाडांची संख्या कमी होते.
- हे यंत्र वापरतांना खुप जोराचा पाऊस किंवा शेतात फार जास्त पाणी असू नये. ज्या शेतकऱ्यांना येत्या हंगामात डायरेक्ट पॅडीसीडर वापर करावयाचा असेल तर त्यांनी तसे नियोजन करावे. असे, आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाहीच्या विभागीय संचालिका डॉ. उषा डोंगरवार यांनी केले आहे.
Share your comments