MFOI 2024 Road Show
  1. यांत्रिकीकरण

शेतीतील यांत्रिकीकरण गरज व फायदे

मराठवाड्यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी आपणास आज परिस्थितीनुसार तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. शेती ही येणाऱ्या काळात स्पर्धात्मक राहणार असून, तिला वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविण्याचे काम सुध्दा पार पाडावे लागणार आहे. त्यामुळे, सध्यस्थितीला आपणास शेतीमध्ये यंत्राचा वापर दर फार मोठया प्रमाणात वाढवावा लागणार आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


मराठवाड्यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी आपणास आज परिस्थितीनुसार तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. शेती ही येणाऱ्या काळात स्पर्धात्मक राहणार असून, तिला वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविण्याचे काम सुध्दा पार पाडावे लागणार आहे. त्यामुळे, सध्यस्थितीला आपणास शेतीमध्ये यंत्राचा वापर दर फार मोठया प्रमाणात वाढवावा लागणार आहे. आधुनिक शेती औजारे व यंत्र यांच्या वापरामुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होऊन पीक लागवड खर्च कमी व शेती संसाधनात बचत हे महत्वाचे फायदे आहेत. येणा-या काळात शेती व्यवसाय पुढे नेण्यास व शेतकऱ्यांचा सामाजिक दर्जा वाढविण्यासाठी शेतीच्या यांत्रिकीकरणावर आपणांस फार मोठया प्रमाणावर भर द्यावा लागणार आहे.

कमी उत्पादन व जास्त खर्च हे सध्याच्या शेतीचे चित्र आहे. भारतीय शेतीत मुलतः बदल घडवून आणण्यासाठी शासनस्तरावर मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. यामध्ये संस्थात्मक आणि तंत्रज्ञानात्मक सुधारणांवर भर देण्यात आला. नवनवीन बी-बियाणे, रासायनिक खते आणि ट्रॅक्टरचा वापर या त्रिसुत्रीने भारतीय शेतीत सुधारणांचे वारे वाहू लागले. त्यालाच आपण हरितक्रांती या नावाने ओळखतो. यामुळे आजपर्यंत आपण अन्नधान्याची उपलब्धता व स्वयंपूर्णतः साधू शकलो.

सध्य स्थितीत शेती विविध निविष्ठांच्या वापरामुळे बऱ्याच प्रमाणात जास्त गुंतवणुकीची होऊन लागवड खर्च हा वाढत चालला आहे. त्यामुळे शेतक-यांना होणारे उत्पादन हे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे काही प्रमाणात शेतकरी हा ख-या अर्थाने हतबल झालेला आहे. भारतीय शेतीत वापरात येणारी पारंपारिक ऊर्जा संसाधने यांचा दर वाढत असून, तो शेतक-यास परवडणारा नसून ऊर्जा किंवा शक्ती वापर दर हा फारच कमी आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ न होता येणारा खर्च हा जास्त आहे. त्यामुळेच सध्य परिस्थतीत भारतीय शेतीत मोठया प्रमाणात योग्य आधुनिक शेती औजारे व यंत्रे वापरणे गरजेचे आहे. सदर यंत्रांच्या वापरामुळे शेतीमध्ये उर्जेचा वापर दर वाढून उत्पादन वाढ व शेती खर्च कमी होण्यास मोठया प्रमाणात मदत होईल. शेती यंत्रे व औजारे वापर दर वाढविण्यासाठी आपणास तंत्रज्ञान प्रसार व प्रचार कार्य मोठया प्रमाणात हाती घेण्याची गरज आहे. सोबतच पीकनिहाय व जमीन पध्दतीनुसार औजारे व यंत्रे शेतीमध्ये वापरण्याकरिता भर द्यावा लागणार आहे.

शेती व्यवसाय हा भारताच्या अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. मुख्यत्वे ग्रामीण भागातील लोक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु, आजघडीस आपण जर पाहिले तर लहान जमीन धारकांची संख्या ही सर्वात जास्त आहे आणि शेती ही पूर्ण यंत्राच्या व औजारांच्या साहयाने करावयाची म्हटले तर ती यंत्रे व औजारे विकत घेणे हे लहान जमीनधारकांना शक्य नाही. त्यामुळे जर असे 15-20 लहान जमीनधारक एकत्र आले व त्यांनी त्यांचा गट स्थापन केला तर गटाच्या माध्यमातून त्यांना ही शेती औजारे व यंत्रे घेणे शक्य होईल. तसेच शासनाच्या नवीन धोरणानुसार आता शासनाची कोणतीही योजना ही एकटया शेतकऱ्याला मिळणार नसून ती आता शेतकरी गटालाच मिळणार आहे.

या बाबतीत उदाहरण द्यायला गेले तर सारोळा ता. जि. उस्मानाबाद या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक गट स्थापन केला व गटाच्या माध्यमातून त्यांनी पैसा जमा करून शेतीसाठी यंत्रे व औजारे विकत घेतली. आज ते शेतकरी जमीन तयार करण्यापासून पेरणी, कुळवणी, फवारणी, काढणी व मळणी हे पूर्णपणे यंत्राच्या सहाय्याने करतात. यासाठी त्यांना एकंदरीत 40 लाख इतका खर्च आला. त्यामध्ये त्यांना शासनाच्या कृषि विभागाकडून 18 लाखांचे अनुदान प्राप्त झाले व उरलेले 22 लाख त्या गटातील शेतकऱ्यांनी हिस्स्याप्रमाणे जमा करून ही सर्व शेती औजारे व यंत्रे विकत घेतली. आपल्या शेतातील कामे यंत्राच्या सहाय्याने करीत असतानाच त्या गटातील शेतकरी ही औजारे व यंत्रे गावातील दुसऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे करण्यासाठी भाडेतत्वावर उपलब्ध करून देतात व यामधून त्यांना गटासाठी उत्पन्न मिळविण्याचा एक स्त्रोत पण निर्माण झाला आहे. बारूळ ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथेही कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली भाडेतत्वावर यंत्र उलपब्धी (Custom Hiring Center) सुरू केलेले आहे.

सध्या कृषि क्षेत्रात उपलब्ध मजुरांचा तुटवडा सातत्याने भासत आहे. त्याची कारणेही अनेक आहेत. जरी 65 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून असली तरी दिवसेंदिवस वाढत जाणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे शेतामधील कष्टाची कामे करण्याऐवजी कमी वेळात थोडयाशा कौशल्याचा वापर करून जास्त पैसे मिळविण्यासाठी बराच मजूर वर्ग शहर आणि औद्योगिक वसाहतीकडे आकर्षिला जात आहे. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये मजुरांची कमतरता भासत आहे. उपलब्ध सामग्री आणि सोयी यांची विभागणी झाल्यामुळे फक्त शेती व्यवसायावर अवलंबून राहणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय कमी काळात, कमी कष्टात आणि आवश्यक असेल त्या ठिकाणीच मजुरांचा उपयोग करून इतर कामे यंत्राव्दारे करणे फायद्याचे होत आहे. म्हणूनच या मजूर टंचाईवर मात करण्याकरिता व आपल्या शेतातील उत्पादकता वाढविणे, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, मालाची ने-आण, साठवणूक व त्यावरील प्रक्रिया करणे हे गरजेचे बनले आहे व त्यालाच आपण ‘शेती यांत्रिकीकरण’ असे म्हणतो. यांत्रिकीकरणामुळे दर हेक्टरी उत्पादकता वाढते हेही सिध्द झालेले आहे. शेतीमध्ये मुख्यतः यंत्रांचा व औजारांचा वापर हा पुढीलप्रमाणे करता येईल.

  • पीक लागवडीसाठी जमीन तयार करणे.
  • काटेकोरपणे पिकाची लागवड.
  • उच्च दर्जाचे आधुनिक पीक फवारणी व आंतरमशागती यंत्रे.
  • कार्यक्षम फवारणी यंत्रे.
  • पीक काढणी व मळणी यंत्रे.
  • पीक, काडीकचरा व्यवस्थापन.


सदर यंत्रांच्या मध्यमातून शेतीमधील पीक लागवडपासून तर शेतातील पीक अवशेष व्यवस्थापन करून पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढ अपेक्षित आहे. यासाठी नवीनतम शेती औजारे व यंत्रे यांच्या शेतीमधील वापरास शेतकरी बंधूंना प्रवृत्त करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पीक काढणी पश्चात कामांकरिता सुध्दा कृषि औजारांची जोड दिली तर पीकाचे मुल्यवर्धन करून शेतीमधून मिळणारा फायदा वाढू शकतो. भारतीय शेतीचा विचार करता, ही शेती पारंपारिक पध्दतीवर व पावसाच्या भरवशावर जास्त प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरडवाहू व ओलीत शेतीसाठी आवश्यक असे आधुनिक शेती औजारे व यंत्रे उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा लागणार आहे. थोडक्यात आपणास शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी सर्वच स्तरावरून मोठया प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत.

शेती यांत्रिकीकरणाचे फायदे:

  • शेतीमध्ये यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बऱ्याच मोठया प्रमाणात बचत होते.
  • पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर होतात.
  • खते, बियाणे आणि किटकनाशकांचा वापर कार्यक्षमतेने होतो.
  • एकूण मजुरांवरील खर्च कमी होतो.
  • पेरणी आणि काढणी वेळेवर करता येते.
  • शेतीतील कामाचा वेग वाढतो.
  • मजुरा अभावी कामांचा खोळंबा होत नाही.
  • कामाची गुणवत्ता वाढते.
  • शेतमालाची प्रत सुधारते.
  • मजुर किंवा जनावरांच्या तुलनेत कमी खर्चात आणि कमी वेळात कामे पूर्ण होतात.
  • अन्नधान्याची काढणी आणि मळणी व त्यानंतरची हाताळणी योग्य तऱ्हेने करता येत असल्यामुळे त्यांची नासाडी कमी होते.
  • वर्षातून एकाच जमीनीवर एकापेक्षा जास्त वेळा पीक घेणे शक्य होऊ लागल्याने दोन हंगामातील कमीत कमी उपलब्ध वेळात शेताची मशागत करणे शक्य होते.
  • यांत्रिकीकरणामुळे उत्पादनात वाढ होते.
  • कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होतो.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होऊन सर्वांगिण विकास व सक्षमीकरण होते.

शेती यांत्रिकीकरणाच्या मर्यादा:

  • शेतकऱ्यांची कमी जमीनधारणा.
  • शेतकऱ्यांची कमी गुंतवणूक करण्याची क्षमता.
  • शेतामध्ये काम करणारे पशु (बैल) मोठया प्रमाणात मिळत असल्यामुळे.
  • शेतामध्ये वेगवेगळया मशागतींसाठी योग्य कृषि यंत्राचा आभाव.
  • कृषि यंत्राची निगा व दुरूस्तीच्या सुविधांसाठी अभाव.
  • तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव.
  • सहकारी संस्था व यंत्र-औजारे बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये सहकार्याचा अभाव.
  • यंत्र व औजारांची जास्त किंमत.
  • यंत्र व औजारांच्या गुणवत्तेमध्ये अभाव.

लेखक:
प्रा. सचिन सूर्यवंशी 
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
9850773023
प्रा. वर्षा मरवाळीकर
शास्त्रज्ञ (गृहविज्ञान)
कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर

English Summary: Needs and benefits of mechanization in agriculture Published on: 08 June 2020, 09:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters