मराठवाड्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी आपणास आज परिस्थितीनुसार तंत्रज्ञान आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. शेती ही येणाऱ्या काळात स्पर्धात्मक राहणार असून तिला वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्याचे काम सुद्धा पार पाडावे लागणार आहे.
त्यामुळे सद्यस्थितीला आपणास शेतीमध्ये विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करणे मोठ्या प्रमाणात वाढवावे लागणार आहे. आधुनिक शेती अवजारे व यंत्रे यांच्या वापरामुळे पिकांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होऊन पीक लागवड खर्च कमी व शेती संसाधनात बचत हे महत्त्वाचे फायदे आहेत. येणार्या काळात शेती व्यवसाय पुढे नेण्यास व सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी शेतीच्या यांत्रिकीकरणावर आपणास फार मोठ्या प्रमाणावर भर द्यावा लागणार आहे. सध्याच्या काळात संस्थात्मक आणि तंत्रज्ञानात्मक सुधारणांवर भर देण्यात आला आहे. नवनवीन बी बियाणे, रासायनिक खते आणि ट्रॅक्टरचा वापर या त्रिसूत्रीने भारतीय शेतीत सुधारणांचे वारे वाहू लागले आहेत. या यांत्रिक संशोधनाच्या कामी कृषी विद्यापीठांच्या संशोधनाचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.
शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रांच्या बाबतीतले संशोधन करून वेगवेगळ्या प्रकारे चे शेतीत सहाय्यभूत ठरणारी यंत्रे विकसित करण्याच्या बाबतीत विद्यापीठांचे योगदान महत्वाचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सध्या भाताची पेरणी करण्यासाठी नवे यंत्र विकसित केले आहे. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
मराठवाडा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताची पेरणी करणे सोपे व्हावे यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भात पेरणी साठी नवीन यंत्र विकसित केले आहे. सध्या हे यंत्र चंद्रपूर कृषी विभागाने जिल्ह्यात आणले असून, या यंत्राच्या वापराने भाताची पेरणी कमी वेळात होत असून या यंत्राच्या वापराने आर्थिक बचत आणि वेळेतही बचत होत आहे. या यंत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या यंत्राच्या साह्याने पेरणी केल्यास एका तासात दीड हेक्टर शेती वर पेरणी केली जाऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांचा वेळ वाचू शकतो.
शेतकऱ्यांचे प्रमुख समस्या ही मजूर असते आणि विशेष म्हणजे खरीप हंगामात पेरणीची लगबग जवळ-जवळ एकावेळेस आल्याने मजुरांची टंचाई निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती संबंधीची कामे तसेच पेरणी ही खोलबतात आणि लांबणीवर जातात. मात्र आता या यंत्राच्या मुळे शेतकऱ्यांची ही अडचण दूर होऊन भात पिकवणाऱ्या जिल्ह्यांसाठी हे यंत्र वरदान ठरणार असल्याचे दिसते तसेच या यंत्राच्या वापराने शेतकरी खूष आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात गावा गावात या यंत्राची मागणी वाढली असून आर्थिक परिस्थिती चांगली असलेले शेतकरी हे यंत्र विकत घेऊ शकतात व सर्व साधारण शेतकरी हे यंत्र भाड्याने वापरू शकतात. सध्या हे यंत्र कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर आणले असून त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले आहे.
Share your comments