रब्बी हंगाम हा पूर्णत: साठवणूक केलेल्या पाण्यावरच अवलंबून असतो. त्यामुळे कृषीपंपाचा वापर हा करावा लागतो. मात्र, पिकांना पाणी देताना कृषीपंपाची योग्य ती काळजी न घेतल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते शिवाय नियमित वेळी पिकांना पाणी देणेही शक्य होत नाही. सध्या ऑटोद्वारे कृषीपंप हे सुरू होतात. त्यामुळे रोहित्रावरील भार वाढल्याने रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीपंपाना ऑटोस्वीच ऐवजी कॅपॅसिटर बसवले तर त्याचा फायदा अधिक होणार आहे.
रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी आता कृषीपंपाचा वापर वाढतो. त्यामुळे शेतकरी विजेचा पुरवठा झाला की आपोआपच कृषीपंप सुरू व्हावेत म्हणून ऑटोस्वीच बसवतात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ तर वाचतो मात्र, इतर अनेक समस्या नव्याने उभ्या राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना नियमित पाणीपुरवठा आणि रोहीत्राचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांची काय होते चूक?
रब्बी हंगामातील पिकांना साठवलेल्याच पाण्याचा आधार असतो. रब्बीची पेरणी झाली की, शेतकरी हे कृषीपंपाना ऑटोस्वीच बसवून विद्युत प्रवाह सुरु झाला की, विद्युत पंप सुरु होईल असे नियोजन करतात. मात्र, परिसरातील सर्वच कृषीपंप असे अचानक सुरु झाले तर रोहित्र जळून विद्युत वाहिन्या बंद होण्याचा धोका असतो.
काळाच्या ओघात आता ऑटोस्वीचा वापर हा वाढत आहे. लाईट आल्यावर शेतात जाऊन विद्युतपंप सुरू करावा लागतो म्हणूनच ऑटोस्वीच वापर हा वाढत आहे. पण यामुळे रोहित्रावरील भार वाढत असून रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पुन्हा रोहित्र उपलब्ध करुन देणे याला अधिकचा वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होण्याचा धोका असतो.
कॅपॅसिटरमुळे नेमका काय फायदा होतो
कृषीपंपाच्या क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवल्यास रोहित्र जळण्याचे किंवा खराब होण्याचा धोका कमी होतो. कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास किंवा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधी खंडित वीजपुरवठा या समस्या सोडण्यास मदत होते. कॅपॅसिटर हे एक स्विच असून पुरवठा होणाऱ्या विजेवर त्यामुळे अंकुश ठेवण्यास मदत होते.
मुबलक पाणीसाठ्याचा उपयोग करुन घ्या
यंदा अधिकच्या पावसामुळे प्रकल्प हे तुडूंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे कृषीपंपाचा वापर करुन रब्बी हंगामातील पिकांची जोपासना करा. मात्र, रब्बी हंगाम सुरु झाला की, कृषी विद्युत पंपाचा वापर वाढतो. त्यामुळे कृषीपंपाना कॅपॅसिटर बसवणे गरजेचे आहे. शिवाय ऑटोस्वीच शेतकऱ्यांचेच नुकसान आहे. उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर करुन घेण्यासाठी कृषीपंपाना कॅपॅसिटर बसवण्याचे अवाहन लातूर विभागाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
Share your comments