1. यांत्रिकीकरण

स्प्रेअरची यंत्राची निवड व खरेदी करताना घ्यावयाची काळजी

पारंपरिक पाठीवरील पंपापासून अत्याधुनिक स्प्रेअरचा वापर शेतामध्ये वाढत आहे. अशा वेळी स्प्रेअरची निवड कोणत्या निकषावर करावी, हा शेतकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे. आपली आवश्यकतेनुसार योग्य तांत्रिक बाबी तपासाव्यात. फवारणी यंत्राच्या योग्य त्या सर्व चाचण्या झालेल्या असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

KJ Staff
KJ Staff


पारंपरिक पाठीवरील पंपापासून अत्याधुनिक स्प्रेअरचा वापर शेतामध्ये वाढत आहे. अशा वेळी स्प्रेअरची निवड कोणत्या निकषावर करावी, हा शेतकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे. आपली आवश्यकतेनुसार योग्य तांत्रिक बाबी तपासाव्यात. फवारणी यंत्राच्या योग्य त्या सर्व चाचण्या झालेल्या असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. पारंपरिक शेतीमध्ये अद्याप नॅपसॅक पंपासारखे ठराविक प्रकार वापरले जातात. अलिकडे द्राक्षासह डाळिंब बागायतदार अत्याधुनिक प्रकारच्या फवारणी यंत्रांचा वापर करू लागला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांमध्ये फवारणी यंत्र कशाप्रकारे निवडावेत, याविषयी अनेक शंका असल्याचे दिसून येते.

फवारणी यंत्रांची खरेदी करताना खालील बाबींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे

  • आपल्याकडील लागवडीचे क्षेत्र, दरवर्षी घेतली जाणारी पिके, फळबागांचे प्रकार यांचा अंदाज घ्यावा.
  • आपल्याला फवारणीसाठी सध्या किती वेळ व मनुष्यबळ लागते, याचे गणित करावे.
  • यानुसार आपल्याला कोणत्या प्रकारचे पॉवर स्प्रेयरची आवश्यकता आहे, याचा अंदाज येऊ शकेल. त्यानुसार पोर्टेबल इंजिन पॉवर स्प्रेयर, नॅपसॅक इंजिन पॉवर स्प्रेयर, बॅकपॅक स्प्रेयर आणि मिस्ट ब्लोअर यामधून निवड करू शकता.
  • एकदा प्रकार ठरल्यानंतर त्याची क्षमता आणि सामर्थ्य याची आवश्यकता तपासावी. त्यात प्रामुख्याने टाकीची क्षमता महत्त्वाची आहे. त्यानंतर त्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा कोणती असावी, याचा विचार करावा. आपल्याकडे प्राधान्याने ट्रॅक्टरच्या पीटीओच्या उर्जेवर म्हणजेच अंतिमतः डिझेल इंधनावर चालणाऱ्या फवारणी यंत्रांना प्राधान्य दिले जाते. परदेशामध्ये फवारणी यंत्रासाठी विद्यूत किंवा गॅस ऊर्जा वापरली जाते. अलिकडे या दोन्ही उर्जेचा एकत्रित वापर करणारी फवारणी यंत्रे तिथे उपलब्ध होत आहेत. त्याला इंग्रजीमध्ये हायब्रीड एनर्जी स्प्रेअर असे म्हणतात. त्यामध्ये दोन टाक्या असतात. मोटरद्वारे ऊर्जा दिले जाणारे स्प्रेयरही उपलब्ध आहेत. आपल्याकडे नियमित उपलब्ध असलेल्या उर्जेच्या यंत्राना प्राधान्य द्यावे.
  • आर्थिक क्षमता: अत्याधुनिक फवारणी यंत्रांच्या किंमती अधिक आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता हा महत्त्वाचा निकष ठरू शकतो. पण आपली आर्थिक क्षमता आहे, म्हणून वर उल्लेखलेल्या निकषांचा विचार न करता विनाकारण अधिक क्षमतेचे फवारणी यंत्र घेणे टाळावे. आपली आवश्यकता, गरज हा निकष अत्यंत महत्त्वाचा आहे. हे लक्षात ठेवावे.
  • अलिकडे विविध कंपन्यांचे स्प्रेअर बाजारात उपलब्ध आहेत. त्यातून आपले तांत्रिक निकष व गरजांची पूर्तता करणाऱ्या यंत्राला प्राधान्य द्या. त्यातही त्या कंपनीने किंवा उत्पादकांने योग्य त्या चाचण्या करून घेतल्या असल्याची व त्याप्रमाणे त्याकडे आवश्यक ती प्रमाणपत्रे असल्याची खात्री करावी.

फवारणी यंत्राच्या चाचणीच्या पद्धती 

भारतामध्ये फवारणी यंत्राच्या चाचण्या या हिस्सार (हरियाणा) येथील मशीनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिटयूट मध्ये केल्या जातात. तिथे विक्रीयोग्य किंवा व्यावसायिक उत्पादनासाठी तयार करण्यात येणाऱ्या कोणत्याही यंत्राच्या चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तसे प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र असलेली यंत्रे विक्री आणि पुढे शासकीय अनुदानासाठी पात्र ठरू शकतात.

फवारणी यंत्रांच्या चाचण्यांसाठी खालील टेस्ट कोड वापरले जातात.

१) आयएस : ११३१३ : २००७ (हायड्रॉलिक ऊर्जा फवारण्यांसाठी तपशील) 

  • यानुसार चाचणी वेळी पंपाची क्षमता प्रति शोषकाच्या किमान ८,००० मिली प्रमाणात द्रावण बाहेर फेकण्याची क्षमता प्रति मिनिट असावी लागते. हा पंप ४० पी.एस.आई. दाबाखाली व्यवस्थितपणे कार्य करण्यास सक्षम असल्याचे तपासणी केली जाते.
  • पिस्टन/प्लंजर प्रकारच्या पंपाची आकारमान (व्हॉल्यूमॅट्रिक) कार्यक्षमता कमीत कमी ८० टक्के असावी लागते.
  • त्यातून तयार होणारा दाब हा उत्पादकाद्वारे घोषित केलेल्या मूल्यापेक्षा कमी नसल्याची खात्री केली जाते. त्याच प्रमाणे इतरही गोष्टी तपासल्या जातात.

२) आयएस : ३६५२ : १९९५ (पीक संरक्षण उपकरणे-फवारणीसाठी वैशिष्ट्ये)

  • सॅम्पल स्प्रेयर थेट उत्पादकाद्वारे संस्थेत चाचणीसाठी सादर केल्यानंतर त्यावर चाचणी करताना ५४०-६६० किलो पास्कल च्या कार्यरत दाबावर जेट द्वारे फेकलेला फवारा हा त्याच्या टोकापासून ६ मीटर अंतरापर्यंत पोचला पाहिजे.
  • स्प्रे गनचा डिस्चार्ज रेट, स्प्रे कोन, गळती अशा अनेक बाबी तपासल्या जातात.

टेस्ट कोडनुसार नमुना स्प्रेअरच्या चाचण्या होऊन, तो उत्तीर्ण झाल्यास त्याचा पूर्ण अहवाल दिला जातो. हा अहवाल यंत्राची विक्री व अनुदानासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. यासोबत या बाबींचीही तपासणी केली जाते.

  • फवारणी यंत्र चालताना त्यातून कोणत्याही वेळी ठरवलेल्या किंवा कॅलिब्रेशन केलेल्या प्रमाणापेक्षा कमी किंवा अधिक द्रावण बाहेर फेकले जात नाही ना, याची खात्री केली जाते.
  • यंत्र चालतेवेळी त्यापासून होणारे हादरे त्याच्या नियंत्रणामध्ये बाधा आणत नाहीत ना, हे पाहिले जाते.
  • त्याचा आवाज, ऊर्जा वापर यातून होणारे प्रदूषण आणि पर्यावरणासाठी हानिकारकता यांचा विचार केला जातो.
  • यंत्र चालवताना वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा धोका लक्षात घेतला जातो.

सुरक्षितता तरतुदी

  • वापरकर्त्याच्या सुरक्षिततेसाठी मुखवटा, हँड ग्लोव्हज तसेच सेफ्टी गॉगल हे दिले पाहिजेत.
  • यंत्रावर सुरक्षिततेची चिन्हे आणि धोक्याची चित्रे दिलेली असावीत.
  • विषारी रसायने व त्यासंबंधीच्या अपघातादरम्यान योग्य त्या प्रथमोपचार व सुरक्षितता सूचना देणे अपेक्षित असते.

लेखक:
अतुल भाऊसाहेब घुले
(सिनियर इंजिनीयर, महिंद्रा संशोधन केंद्र, चेन्नई)
अरुण सर्जेराव वाघमोडे
(पीएचडी स्कॉलर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
८६००४६४६२०
सुश्मिता दिलीप काळे
(सहाय्यक प्राध्यापक, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक)

English Summary: Care to be taken while choosing and purchasing the sprayer machine Published on: 12 May 2020, 09:39 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters