1. यांत्रिकीकरण

ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल

कमी पाण्यात अधिक उत्पादन यासाठी सूक्ष्म सिंचनाचा भाजीपाला व फळ पिकात अवलंब केला जातो परंतु आता ऊसासारख्या पिकातही ठिबक सिंचनाचा वापर होताना दिसतो आहे म्हणजेच ठिबक सिंचनाचा वापर वाढतो आहे सूक्ष्मसिंचन पद्धतीत ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल घेणे जरुरीचे आहे ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करणे गरजेजे आहे. जेणेकरून वेळेची, उर्जेची बचत होते व संचाचे जीवनमान वाढते.

KJ Staff
KJ Staff

कमी पाण्यात अधिक उत्पादन यासाठी सूक्ष्म सिंचनाचा भाजीपाला व फळ पिकात अवलंब केला जातो परंतु आता ऊसासारख्या पिकातही ठिबक सिंचनाचा वापर होताना दिसतो आहे म्हणजेच ठिबक सिंचनाचा वापर वाढतो आहे सूक्ष्मसिंचन पद्धतीत ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल घेणे जरुरीचे आहे. ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करणे गरजेजे आहे. जेणेकरून वेळेची, उर्जेची बचत होते व संचाचे जीवनमान वाढते.

पंपाची देखभाल:

पंपाच्या पुढे एक पाणी मोजण्याचे यंत्र (वॉटर मीटर) बसवावे. पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा दाब आवश्यकतेपेक्षा कमी अधिक झाल्यास पंप तपासून त्याची कारणे शोधावीत व दुरुस्ती करावी. दर दोन दिवसांनी पंपाचा आवाज, त्याचे तापमान, गळती तपासावी. विद्युत मोटार, स्विचेस, मीटर व स्टार्टर यांची उत्पादकाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार निगा ठेवावी.

 

ठिबक सिंचन संचाच्या गाळण यंत्रणेची देखभाल:

अ) स्क्रीन फिल्टर (जाळीची गाळणी) ची स्वच्छता:

ठिबक सिंचन पाण्याच्या गाळणीसाठी स्क्रीन फिल्टर वापरतात. सामन्यत: १२० मेश (०.१३ मिमी) आकाराच्या छिद्रांची जाळी वापरले जाते.

  • प्रथमत: संच बंद करून स्क्रीन फिल्टर दाब विरहित करावे.
  • फिल्टरचे बाहेरील आवरण खोलून फिल्टर ची जाळी वेगळी करावी व स्वच्छ पाण्याने साफ करावी.
  • रबर सील जाळी पासून काढून आवश्यकता असल्यास नवीन बसवून सील व्यवस्थीत असल्याची खात्री करावी.
  • फिल्टर च्या तळाशी असलेल्या हॉल्व्हचा उपयोग करून जाळी भोवतीची घाण काढून टाकावी.

ब) सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरची (वाळूची गाळणी) स्वच्छता:

धरणे, नद्या, कालवे यांतील पाण्यातून येणारे शेवाळ, सेंद्रिय पदार्थ व कचरा वेगळा करण्यासाठी सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरचा उपयोग होतो. ग्रॅव्हेल फिल्टरच्या अगोदर व पुढे असे २ दाबमापक यंत्रे (प्रेशर गेज) बसवलेले असतात. दाबमापक यंत्रातील पाण्याच्या दाबाचे १० टक्क्यापेक्षा जास्त पतन झाल्यास ग्रॅव्हेल फिल्टर साफ करावे, किंवा आठवड्यातून एकदा साफ करावे. याची स्वच्छता करताना बॅक फ्लशिंग (विरुध्द प्रवाह) तंत्राचा वापर करतात. याद्वारे पाण्याचा प्रवाह विरुध्द दिशेने करून फिल्टर साफ केले जाते  ते खालीलप्रमाणे:

  • सिंचनप्रणाली चालू असताना बायपास हॉल्व्ह पूर्णपणे उघडा करून बॅक फ्लशिंग हॉल्व्ह पूर्णपणे चालू करावा.
  • मुख्य कंट्रोल हॉल्व्ह व आऊटलेट हॉल्व्ह पूर्णपणे बंद करावा.
  • फ्लशिंग करते वेळी बायपास हॉल्व्ह अंशत: बंद करून सिंचन प्रणालीचा दाब सामान्य दाबापेक्षा ३० टक्के अधिक वाढवावा.
  • बॅक फ्लश हॉल्व्हमधून स्वच्छ पाणी येईपर्यंत पंप चालू ठेवावा. स्वच्छ पाणी आल्यानंतर पंप बंद करावा.

क) हायड्रोसायक्लोन फिल्टरची स्वच्छता:

या फिल्टरचा उपयोग सिंचनाच्या पाण्यातील वाळूचे कण वेगळे करण्यासाठी होतो. हा फिल्टर नरसाळ्याचा आकाराचा असतो, त्याचा निमुळता भाग तळाशी एका आडव्या टाकीला जोडलेला असतो. टाकी मध्ये पाण्यातून वेगळी काढलेली वाळू गोळा होते. टाकीला असलेला हॉल्व्ह उघडून जमा झालेली वाळू काढून टाकावी.

ड) डिस्क फिल्टरची स्वच्छता:

या फिल्टरचा उपयोग सिंचनाच्या पाण्यातून घन कण काढून टाकण्यासाठी होतो.

  • डिस्क फिल्टर उघडून सर्व चकत्या मोकळ्या कराव्यात व एका दोरीत बांधून घेऊन स्वच्छ पाण्यात धुवून घ्याव्यात.
  • मोठ्या बादलीत १० टक्के तीव्रतेचे हायड्रोक्लोरिक अॅसिड अथवा हायड्रोजन परॉक्साईड च्या द्रावणात या चकत्या साधारणपणे अर्धा तास ते दोन तास बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
  • सर्व चकत्या पूर्वी होत्या त्या स्थितीत ठेवून फिल्टर ची जोडणी करावी.

आम्ल प्रक्रिया:

लॅटरल व ड्रीप मध्ये साचलेले क्षार जसे कॅल्शिअम कार्बोनेट, मॅग्नेशिअम कार्बोनेट, किंवा फेरीक आक्साइड ठिबक सिंचन संचाचे कार्य मंदावतात अथवा बंद पाडतात. हे जमा झालेले क्षार स्वच्छ करण्यासाठी आम्ल प्रक्रिया करतात. त्यासाठी सल्फुरिक आम्ल (६५ टक्के), हायड्रोक्लोरिक आम्ल (३६ टक्के), नायट्रिक आम्ल (६० टक्के) किंवा फॉस्फेरिक आम्ल (८५ टक्के) यापैकी कुठलेही उपलब्ध होणारे आम्ल वापरू शकतो.

आम्ल द्रावण तयार करण्याची पध्दती :  

  • एका प्लॅस्टिक च्या बादलीमध्ये एक लिटर पाणी घेऊन, त्यात आम्ल (अॅसिड) मिसळत जावे.
  • आम्ल मिसळताना मधेमध्ये पाण्याचा सामू पीएच मीटरने अथवा लिटमस पेपरने मोजावा.
  • पाण्याचा सामू ३ ते ४ होईपर्यंत (लिटमस पेपर चा रंग फिकट गुलाबी होईपर्यंत) पाण्यात आम्ल मिसळत जावे.
  • पाण्याचा सामू ३ ते ४ करण्यासाठी किती आम्ल लागले ते लिहून ठेवावे.
  • पंप चालू केल्यानंतर संचाच्या शेवटच्या ड्रीपर पर्यंत पाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो याची नोंद घ्यावी. साधारणत: १५ मिनिटे वेळ लागतो असे गृहीत धरू.
  • संचातून पाणी वाहण्याचा दर लक्षात घेऊन १५ मिनिटात त्या संचातून किती पाण्याचा विसर्ग होणार आहे, त्याचा हिशेब करून त्यासाठी लागणारे आम्लाचे प्रमाण काढावे. त्यासाठीचे सूत्र खालीलप्रमाणे:

एकूण १५ मिनिटात संचातून सोडायचे आम्ल (लिटर)= १५ मिनिटात संचातून होणारा पाण्याचा विसर्ग (लिटर) X १ लिटर पाण्याचा सामू ३ होण्यासाठी लागणारे आम्ल (लिटर)

आम्ल प्रक्रिया करण्याची पध्दती:  

  • आम्ल प्रक्रिया करण्यापूर्वी, अंशत: किंवा बंद पडलेले ड्रीपर्स (तोट्या) खूण करून ठेवावे. तसेच फिल्टर, मेन आणि सबमेन लाईन फ्लश करून घ्यावे.
  • ठिबक सिंचन संच सामान्य दाबाने चालू ठेवावा व वरील सूत्राप्रमाणे मिळवलेले आम्लाचे द्रावण तयार करून घ्यावे.
  • पाण्याचा संचामधून किती प्रवाह चालू आहे, ते तपासून पाहून त्यानुसार प्रवाह निश्चित करावा.
  • व्हेंच्युरी किंवा फर्टीलायझर इंजेक्शन पंपाच्या सहाय्याने योग्य प्रमाणात आम्लाचे द्रावण सिंचन प्रणालीमध्ये सोडायला सुरुवात करावी. या वेळी आम्लाच्या द्रावणाचा दर व पूर्ण प्रवाहाचा सामू ३ राहील अशा प्रकारे निश्चित करावा.
  • आम्ल द्रावण साधारणत: १५ मिनिटे संचातून सोडावे व व्हेंच्युरी किंवा फर्टीलायझर इंजेक्शन पंप बंद करावे.
  • ही प्रक्रिया झाल्यानंतर संच २४ तास बंद ठेवावा. नंतर संपूर्ण ठिबक सिंचन संच १५ ते २० मिनिटे चालवून फ्लश करावा.
  • आधी खूण करून ठेवलेले ड्रीपर्स (तोट्या) मधून पाणी पूर्ण क्षमतेने पडत आहे किंवा नाही हे तपासून पहावे, नसल्यास परत आम्ल प्रक्रिया करावी.

क्लोरीन प्रक्रिया (क्लोरिनेशन):

ठिबक संचातील पाईप, लॅटरल, ड्रीपर्स यामध्ये झालेल्या शेवाळ वाढीमुळे संचाची कार्यक्षमता मंदावते. ठिबक सिंचन संचामध्ये जैविक व सेंद्रिय पदार्थाची झालेली वाढ रोखण्यासाठी क्लोरीन प्रक्रियेचा उपयोग होतो. यासाठी ब्लिचिंग पावडर (कॅल्शिअम हायपोक्लोराईट) चा उपयोग करावा, त्यामध्ये ६५ टक्के मुक्त क्लोरीन असतो. अथवा सोडीअम हायपोक्लोराईट वापरावे, त्यामध्ये १५ टक्के मुक्त क्लोरीन असतो. ब्लिचिंग पावडर हा सर्वात स्वस्त व सहज बाजारात उपलब्ध होणारा क्लोरीन चा स्रोत आहे. परंतु, सिंचनाच्या पाण्यामध्ये कॅल्शिअम चे प्रमाण (२० पीपीएम पेक्षा जास्त) जास्त असल्यास ब्लिचिंग पावडर वापरू नये. आम्ल प्रक्रियेची गरज असल्यास टी क्लोरीन प्रक्रियेपूर्वीच करून घ्यावी, कारण बाहेर पडणारा क्लोरीन वायू विषारी असतो. क्लोरीन प्रक्रिया खालीलप्रमाणे करावी:

  • ठिबक सिंचन संचाच्या विसर्ग दराप्रमाणे पूर्ण संचातून २० ते ३० पीपीएम क्लोरीन जाईल एवढे क्लोरीन द्रावण संचात सोडून संच २४ तास बंद ठेवावा.
  • क्लोरीन चे द्रावणातील प्रमाण मोजण्यासाठी क्लोरीन पेपर चा उपयोग करावा.
  • नंतर संपूर्ण ठिबक संच फ्लश करून घ्यावा.

श्री. राहुल कावले
विषय विशेषज्ञ, कृषि अभियांत्रिकी, कृषि विज्ञान केंद्र, दहिगांव-ने, ता. शेवगांव, जि. अहमदनगर
०२४२९- २७२०३०, २७२०२०
 

English Summary: Care Taken & Maintenance of Drip Irrigation Published on: 16 August 2018, 04:48 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters