बुलडाणा : राज्यात पशुपालकांची संख्या वाढत आहे, पण जनावरांच्या आहाराविषयी आरोग्याविषयी बऱ्याच पशुपालकांना माहिती नसते. यासाठी आपण जनावरांच्या आहाराविषयी विशेष काळजी घेतली पाहिजे. काही भागात चाऱ्याचा मोठा तुटवडा असतो, अशा भागात चाऱ्याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे. गुरांना चारा घालताना अधिक वाया जाऊ नये याची काळजी पशुपालकांनी घेतली पाहिजे. दरम्यान यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील पशुपालकांसाठी कडबा कुट्टीवर अनुदान देण्याचे ठरवले आहे.
दूध उत्पादन वाढविण्याच्या अमुषंगाने चाऱ्याचा योग्य वापर व्हावा. तसेच चारा वाया जावू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात महादूध प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवली आहे. यामध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
या योजनेचा पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत डीबीटीनुसार लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी स्वत: नामांकित कंपनीकडून कडबा कुट्टी यंत्र खरेदी करावे. त्याचे जीएसटीचे देयक, फोटो, पशुसंवर्धन अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करावे. यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ५० टक्के अनुदानाची रक्कम जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत जमा करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांचा प्रस्ताव पंचायात समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्याकडे सादर करावा. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Share your comments