आजच्या तरुण वर्गाला योग्य प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास ते आपल्या कुटुंबाचा आधार बनू शकतील, त्यांच्यासाठी रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे असे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांनी येथे सांगितले.
राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ५८ हजार युवक युवतींसाठी कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिशन दीनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत कौशल्य मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.
‘हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील सद्यस्थिती आव्हाने आणि प्रगती’ याबाबत व ग्रामीण भागातील गरीब व गरजू युवक युवतींना रोजगार मिळवून देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. यावेळी सुमारे वीस मोठ्या कंपन्यांनी या मुलांना रोजगार देण्याची तयारी दर्शवीली. यावेळी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या रेल्वेशी संबंधीत कंपनीचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश राणा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
श्रीमती विमला म्हणाल्या, राज्यात या अभियानाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील प्रशिक्षण घेतलेल्या ७० टक्के प्रशिक्षणार्थींना चांगल्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे. वेस्ट साईड, पिझा हट, मोठे हॉटेल्स व इतर सेवा क्षेत्रात संधी मिळाली आहे. ‘कॅफे कॉफीडे’ या रेस्टॉरंटच्या चेनमध्ये आता पर्यंत सुमारे हजार विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. यातील काही विद्यार्थी परदेशात जाऊन प्रतिनीधित्व करून आले आहेत. प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी हे कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करू शकतात हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. त्यामुळे यापुढेही मोठ्या कंपन्यांनी या तरुणांना रोजगार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.
श्री. राणा यांनी या दीनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत प्रशिक्षित राज्यातील युवक युवतींना आयआरसीटीसीच्या कॅटरिंग सर्विसेस मध्ये सामावून घेण्याची शिफारस रेल्वे बोर्डाकडे करणार असल्याचे सांगितले. कॅटरिंग, टुरिझम, रेल नीर आणि ई- टिकीटींग या चारही सेक्टरमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ही संख्या सुमारे एक लाख एवढी आहे. राज्यातील तरुणांना त्यांच्याच भागात नोकरी करण्याची संधी मिळावी यावरही त्यांनी भर दिला.
यावेळी उपस्थित कंपन्यांच्या मान्यवर प्रतिनिधींचा तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या निवडक लाभार्थ्यांचा श्रीमती विमला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिशन दीनदयाल ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत १५ ते ३५ वयोगटातील ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील युवक व युवतींना किमान ३ महिन्याचे निवासी व मोफत प्रशिक्षण दिले जाते. राज्यात सध्या ७० प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण सुरु आहे. आतापर्यंत १२ हजार ५७४ लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून ९ हजार ३५६ युवक युवतींना रोजगाराची संधी मिळाली आहे. सध्या राज्यात एकूण २१ हजार ५७४ लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
Share your comments