माशांचा मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ म्हणून उपयोग करण्यात येतो. माशांपासून प्रथिने अगदी सहजरित्या उपलब्ध होत असल्याने पोषणाची कमतरता कमी करण्यासाठी असलेल्या आरोग्यदायी पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय आहे.
मत्स्यव्यवसाय मध्ये रोजगार आणि उत्पन्न वाढवण्याची चांगलीच क्षमता आहे. या लेखात आपण मत्स्य व्यवसायातील स्वयंरोजगाराच्या संधी बद्दल जाणून घेऊ.
- मत्स्य व्यवसायातील स्वयंरोजगाराच्या संधी :
1) बायॉफ्लॉक क्लचर :- या पद्धतीत जलसंवर्धन प्रणाली मध्ये मर्यादित पाण्याच्या देवाण-घेवाणीसह उच्च साठवण घनता, सतत वायुविजन आणि बायोफ्लॉक तंत्रज्ञान वापरले जाते. हे कारप्स, कोळंबी आणि कॅट फिश यांच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे.
2) मासे आणि कोळंबी संवर्धन:- जर तुमच्या शेतात तलावाची सोय असेल तर मासे आणि कोळंबी संवर्धन करून त्यामाध्यमातून रोजगाराचा अतिरिक्त स्त्रोत निर्माण होऊ शकतो. मासे किंवा कोळंबीची पिल्ले तलावात साठवून ठेवता येतात. या पिल्लांची शास्त्रोक्तपद्धतीने संवर्धन केले तर त्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळते.
3) एक्वापोनिक्स :- या प्रणालीमध्ये टोमॅटो, मिरची, पालक, त्यातील लहान वनस्पतीं सोबतच माशांचे संवर्धन केले जाते. माशांचे मलमूत्र वनस्पतींसाठी पोषक म्हणून कार्य करते. लहान जागेत मासे आणि वनस्पती या दोघांचे संवर्धन उत्तमरीत्या करता येते.
4) मत्स्य खाद्य उत्पादन :- मत्स्य व्यवसायासाठी खाद्य हे एक अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. एकूण उत्पादनात खर्चाच्या जवळपास 60 टक्के खर्च खाद्यावर होतो. माशांची संवर्धनाची घनता जास्त असल्यामुळे अशा परिस्थितीत खाद्य महत्त्वाची भूमिका बजावते. माशांच्या वेगवेगळ्या अवस्था आणि आकारानुसार खाद्य वेगवेगळ्या आकारात तयार करता येते. त्यामुळे खाद्य उत्पादन स्वयंरोजगाराला व्यापक संधी आहे.
5) एक्वा क्लीनिक :- माशांवर उपचार आणि पाणी, मातीच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी एक्वा क्लिनिक उभारण्यासाठी मोठी संधी आहे. यासाठी लहान जागा आणि सामू मिटर / पेपर, डीओ टेस्टिंग किट, अमोनिया टेस्टिंग किट, थर्मामीटर, केमिकल्स इत्यादी यांसारख्या काही गोष्टी लागतात.
6) सल्ला आणि सेवा :- मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध प्रकारच्या बाबी जसे की मत्स्यरोग निदान आणि उपचार, मत्स्यपालन तंत्र,पाण्याची गुणवत्ता व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन इत्यादी बाबत मच्छ पालकांना माहिती देण्याची सुविधा आहे. पदवीधर सल्लागार असे युनिट सुरू करू शकतो.
नक्की वाचा:बारामतीच्या पिवळ्या कलिंगडांची जयंत पाटलांना भुरळ, म्हणाले बारामतीकरांकडे..
7) माशांपासून मूल्यवर्धित उत्पादने:- माशांपासून विविध प्रकारची उत्पादने बनवून त्यांचे मूल्यवर्धन करता येते. कोळंबी, लोणचे, फिश वडा, फिश शेव, फिश पापड, फिश चकली, जवळा चटणी, फिश कटलेट, फिश सामोसा इत्यादी. मूल्यवर्धित उत्पादने लहान स्तरावर माशांपासून तयार केले जाऊ शकतात. आणि ते बरेच कालावधी पर्यंत साठवता येऊ शकतात.
Share your comments