मुंबई- देशभरातील 10 लाखांहून अधिक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला प्रविष्ट होतात. उच्चपदस्थ अधिकारी होण्याची संधी अजमाविताना कष्टासोबत नियोजनपूर्वक अभ्यासाची आखणी महत्वाची ठरते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची किमया साधलेल्या शुभम कुमारने पेनाच्या निवडीपासून थेट मुलाखतीच्या तयारीपर्यंत कृषीजागरणशी बोलताना यशाचा ‘खास’ मार्ग सांगितला आहे.
जाणून घेऊया यशवंताच्या नजरेतून यूपीएससीचे अभ्यास शिखर कसे सर करावे:
1. प्रयत्नांवर श्रद्धा हवी:
यशाचा मार्ग प्रशस्त असला तरी अपयशाचे थांबे लागू शकतात. शुभमला यशापर्यंत पोहचण्यासाठी तीन संधी अजमाव्या लागल्या होत्या. तयारी ते निवड या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या प्रयत्नांवरील श्रद्धा अत्यंत महत्वाची असल्याचे शुभमने म्हटले आहे.
2. सराव अर्थातच ‘नेट प्रॅक्टिस’
परीक्षेला सामोरे जाताना परिपूर्ण सराव असल्यास यशाचा मार्ग सुकर होतो हे शुभमने जाणले आहे. दिवसाला प्रत्येक विषयाची एक प्रश्नपत्रिका सोडविण्याचा नित्यक्रम शुभमने आखून घेतला होता. मित्रांसोबत गट बनवून प्रश्नांची देवाणघेवाण देखील केली जात असे.
3. ग्रामीण हीच ताकद
स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी आर्थिक पार्श्वभूमी, शहरी किंवा ग्रामीण यापेक्षा इच्छाशक्ती महत्वाची ठरते. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती बाळगल्यास यश हमखास पदरात पडेल असे शुभम याने म्हटले आहे.
Share your comments