HSC Paper Leak Case: बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. बारावीचा गणिताचा पेपर अहमदनगरच्या महाविद्यालयातील 119 विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तासभर आधी मिळाल्याची माहिती क्राईम ब्रान्चच्या तपासातून समोर आली आहे. गणिताचा पेपर सोपवण्यात आलेल्या एचएससी बोर्डाच्या सदस्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.
बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चने ही कारवाई केली आहे. क्राईम ब्रान्चच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3 मार्चला बारावी गणिताचा पेपर महाविद्यालयातील विद्यार्थांना एक तास आधीच मिळाला होता.
कृषी मंत्रालयाने 3 वर्षात 44000 कोटी रुपये केले परत; धक्कादायक माहिती आली समोर
'या' कारणासाठी महाविद्यालयानेच फोडला पेपर
चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांनी आपल्या महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी परीक्षेपूर्वीच गणित विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली होती. जवळपास एक तास आधी विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका देण्यात आली होती.
गणिताचा पेपर सोपवण्यात आलेल्या एचएससी बोर्डाच्या सदस्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या आतापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या महाविद्यालयात 337 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 119 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे महाविद्यालयातच आले होते. शाळेचा निकाल 100 टक्के लागावा या उद्देशाने शाळेच्या व्यवस्थापनाने पेपर फोडला. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपये घेतल्याचे समोर आलं आहे. याचा तपास सध्या सुरु आहे.
विद्यार्थ्यांची चौकशी करणार
महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र इतर महाविद्यालयात आले अशा विद्यार्थ्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. परंतु सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत आणि विद्यार्थी अल्पवयीन आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये यासाठी परीक्षा संपल्यानंतर चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रान्चच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Share your comments