पशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम जोपासना करून चांगली गाय, म्हैस तयार करणे फायदेशीर ठरते. वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसरबरोबर काफ स्टार्टरचा वापर करणे जलद वाढीसाठी पोषक ठरते.
काफ स्टार्टर हा लहान वासरांसाठी घन स्वरूपातील पोषणतत्त्वयुक्त खुराक आहे. काफ स्टार्टर वासरांना त्यांच्या वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते चार महिने वयापर्यंत द्यावे. काफ स्टार्टरची सुरुवात १०० ग्रॅमपासून करून हळूहळू प्रमाणात वाढ करून दोन किलोपर्यंत काफ स्टार्टर वासरांना देता येते. काफ स्टार्टरचे प्रमाण वासरांच्या आहारात हळूहळू वाढवावे. सुरुवातीला वासरू हे काफ स्टार्टर खाद्य खात नाही, हे लक्षात घेऊन वासरांची काफ स्टार्टर खाण्याची इच्छा वाढवण्यासाठी सुरुवातीला थोडे काफ स्टार्टर हातात घेऊन वासरांच्या जिभेवर चोळावे.
काफ स्टार्टर तयार करण्यासाठी कडधान्ये, पेंडी, प्राणिजन्य प्रथिनयुक्त पदार्थ, भुसा तसेच जीवनसत्त्व आणि क्षार मिश्रण, प्रतिजैविके आणि इतर खाद्यघटकांचा वापर केला जातो.काफ स्टार्टरमध्ये सर्वसाधारणपणे २३ ते २६ टक्के प्रथिने, ४ टक्के स्निग्ध पदार्थ, ७ टक्यांपर्यंत तंतुमय पदार्थ, ॲसिड इन सोल्युबल ॲशचे जास्तीत जास्त प्रमाण २.५ टक्के, आयोडीनयुक्त मीठ १ टक्का, कॅल्शिअम व फॉस्फरस प्रत्येकी कमीत कमी ०.५ टक्के, तसेच जीवनसत्त्व अ, ड३ ,ई आणि अफ्लाटॉक्सीन बायंडर यांचा समावेश असतो.
वासरांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांच्या आहारात प्रथिनांचा वापर आवश्यक असतो. कारण शरीरातील स्नायूंची झपाट्याने वाढ होण्यासाठी अमिनो आम्लांची गरज असते. जसजसे वासरांचे वय वाढेल तसतसे त्यांची प्रथिनांची गरज कमी होत जाते.
जन्मल्यानंतर लगेच वासरामध्ये कोठीपोटाची पूर्णत: वाढ झालेली नसते. त्यामुळे त्यांच्या आहारात जास्त उपलब्धता असणाऱ्या प्रथिनांचा समावेश करणे आवश्यक असते.
कोठीपोटाची वाढ झाल्यानंतर कमी प्रतीच्या प्रथिनांचे चांगल्या प्रतीच्या प्रथिनांमध्ये कोठीपोटातील उपयुक्त जिवाणू रूपांतर करतात. त्यामुळे अशावेळी उच्चप्रतीच्या प्रथिनांबरोबर काही प्रमाणात कमी प्रतीच्या प्रथिनस्रोतांचा वापर केला तर चालतो. वयाच्या तीन महिन्यांपर्यंत नर व मादी वासरांची वाढ सारख्याच गतीने होत असते. परंतु तीन महिन्यांनंतर मादी वासरांची नर वासरांच्या तुलनेत कमी गतीने वाढ होते.
काफ स्टार्टर बनवण्यासाठी खाद्य घटकांची निवड करताना त्या घटकांची चव, त्यातील उपलब्ध होण्याऱ्या पोषणतत्त्वांची प्रमाण या बाबी लक्षात घ्याव्यात.
वासरांना शक्यतो मासळी, रक्ताची भुकटी, बिअर फॅक्टरीतील दुय्यम पदार्थ आवडत नाहीत. काफ स्टार्टर हे शक्यतो गोळी/ कांडी पेंडेच्या स्वरूपात असते. या गोळी/ कांडी पेंडेच्या बाह्य स्वरूपाचा खाण्याच्या प्रमाणावर म्हणावा तितका परिणाम होत नाही.काफ स्टार्टरमध्ये मळीचा वापर ३ ते ५ टक्यांपर्यंत करता येतो. गोळीयुक्त काफ स्टार्टरमुळे वासरांच्या कोठीपोटातील द्रावणाचा सामू कमी होऊ शकतो. त्यामुळे कधी कधी आम्लधर्मीय अपचन झाल्याचे दिसून येते. हे टाळण्यासाठी काफ स्टार्टर व चारापिकांचा वासरांच्या आहारात वापर करावा.
Share your comments