जनावरांना विविध प्रकारच्या गोष्टींची विषबाधा होऊ शकते. युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते. त्यामुळे जनावरांचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या लेखात आपण युरिया विषबाधेची कारणेआणि करायच्या उपाय योजना या बद्दल माहिती घेऊ.
युरिया विषबाधेची प्रमुख्याने कारणे
- युरिया विषबाधेचे प्रमुख कारण हे पशुखाद्यामध्ये किंवा युरिया प्रक्रियायुक्त चारा यामध्ये याचे प्रमाण जास्त झाले तर हे युरिया विषबाधेचे कारण ठरू शकते.
- पेरणीच्यावेळी बांधावर ठेवलेल्या युरिया खताच्या रिकाम्या गोण्या जनावरांनी चाटल्यास युरिया विषबाधा होऊ शकते.
- युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीन पेंड किंवा सोयाबीनचा भरडा चारल्यास युरिया विषबाधा होऊ शकते.
- दुभत्या जनावरांना खुराका मधून जास्त प्रमाणात यूरियाखाऊ घातल्यास युरिया विषबाधा होऊ शकते.
जनावरांमधील युरिया विषबाधेची लक्षणे
- जनावरांच्या तोंडाला फेस येतो.
- जनावरांचे पोट फुगते व पोटामध्ये वेदना होतात.
- जनावरांना नीट उभे राहता येत नाही.
- विषबाधा झालेली जनावरे सतत ऊठ-बस करतात. तसेच विषबाधा झालेली जनावरे डोळे मोठे करतात व थोडी थोडी लघवी करतात.
- जनावरांना झटके सुद्धा येऊ शकतात.
- युरिया जास्त प्रमाणात पोटात गेल्यामुळे पोटामध्ये अमोनिया वायू तयार होऊन पोटात अॅसिडासिसतयार होते. त्यामुळे जनावर बेशुद्ध होऊन मृत्यू पावते.
युरिया विषबाधा झाली तर उपचार
- युरिया विषबाधा झालेल्या जनावरांना लवकरात लवकर दोन ते आठ लिटर ताक पाजावे.
- तसेच थंड पाणी पाजावे.
- पोटात तयार झालेला वायू काढण्यासाठी जनावरांच्या तोंडामध्ये घोड्याचा लगाम घालावा. त्यामुळेच जनावरांचे तोंड सतत उघडे राहून पोटातील अमोनिया वायू बाहेर पडतो.
- तसेच पशुवैद्यकाच्या साह्याने लवकरात लवकर उपचार करावेत.
युरिया विषबाधा होऊ नये म्हणून करायचे प्रतिबंधात्मक उपाय
- पशुखाद्य द्वारे आवश्यकतेपेक्षा अधिक युरियाचा वापर करणे टाळावे.
- दूध देणाऱ्या जनावरांना पशुखाद्य द्वारे युरिया खाऊ घालू नये.युरियाच्या गोण्या व पशुखाद्य वेगळ्या ठिकाणी ठेवावीत.
- युरिया प्रक्रिया केलेला चाऱ्या सोबत जनावरांना सोयाबीन पेंड किंवा सोयाबीनचा भरडा खाऊ घालू नये.( स्त्रोत-ॲग्रोवन)
टीप- कुठल्याही औषध उपचार करण्या अगोदर पशुवैद्यकाचा सल्ला अवश्य घ्यावा.
Share your comments